जगातील पहिली सर्वांत उंच इमारत औरंगाबादेत होती!
By Admin | Updated: July 13, 2014 00:46 IST2014-07-13T00:43:17+5:302014-07-13T00:46:02+5:30
प्रशांत तेलवाडकर , औरंगाबाद जगातील सर्वांत पहिली आठ मजली उंच इमारत १८४९ मध्ये शिकागोमध्ये उभारण्यात आली, अशी इतिहासात नोंद आहे.

जगातील पहिली सर्वांत उंच इमारत औरंगाबादेत होती!
प्रशांत तेलवाडकर , औरंगाबाद
जगातील सर्वांत पहिली आठ मजली उंच इमारत १८४९ मध्ये शिकागोमध्ये उभारण्यात आली, अशी इतिहासात नोंद आहे. मात्र, त्याआधी १७ व्या शतकात भारतात त्याही औरंगाबादेत ७ व ९ मजली इमारती बांधण्यात आल्या होत्या, असा पुरावा इतिहास संशोधक डॉ. शेख रमजान यांना मिळाला आहे. त्या काळातील सात व नऊ मजली इमारतीच्या खरेदी-विक्रीचे अस्सल पत्रे अनेक वर्षांच्या संशोधनानंतर त्यांना मिळाली आहेत. त्याद्वारे जगातील सर्वांत उंच इमारत सर्वप्रथम औरंगाबादेत उभारण्यात आली असल्याचा रमजान यांचा दावा आहे.
इतिहासात अशी नोंद आहे की, १८४९ साली विल्यम जॉन्स्टन याने शिकागो येथे सर्वांत मोठी (८ मजली) इमारत उभारली. नंतर ३६ वर्षांनी शिकागो येथेच विल्यम ले बॅरग जेनी याने ‘लाइफ इन्शुअरन्स कंपनी’साठी १० मजली इमारत बांधली.
मात्र, या जगातील बांधण्यात आलेल्या पहिल्या उंच इमारती नसल्याचे डॉ. शेख रमजान यांचे म्हणणे आहे. रमजान यांच्या म्हणण्यानुसार १०० वर्षे आधीच औरंगाबादेत सात, आठ व नऊ मजली इमारती उभारण्यात आल्या होत्या. भारतातील स्थापत्यशास्त्र तेव्हा एवढे प्रगत होते, हे सत्य संशोधनातून समोर आले आहे.
यासंदर्भात शेख रमजान म्हणाले की, औरंगाबादेत इ.स. १७२० ते १७२७ मध्ये सात व नऊ मजली इमारती बांधलेल्या होत्या. तेव्हा स्थापत्यशास्त्र प्रगत होते याची प्रचीती येते. माझ्याजवळ शेकडो अस्सल सनदा, खरेदीपत्रे, विक्रीपत्रे आहेत. त्यांचा अभ्यास केल्यावर मला असे दिसले की, आजमगंज मोहल्ला (सध्याच्या मिल कॉर्नरजवळ), मोगलपुरा, तसेच मेहमूदपुरा (हिमायतबाग ते हर्सूल रोड) या परिसरात त्याकाळी उंच इमारती होत्या. या परिसरात तेव्हा श्रीमंतांची वसाहत होती. ४ ते ७ मजल्यांपर्यंत इमारती होत्या. यात बेगमपुऱ्यात त्या काळी ९ मजली इमारती बांधण्यात आल्या होत्या. मेहमूदपुऱ्यात हिरे-जवाहिराचा मोठा व्यापार होता. त्या काळचा तो ‘जव्हेरी बाजार’च होता. सिडकोच्या वसाहतीमुळे तेथील घरे, बागा नष्ट झाल्या. शहरातील जुन्या घरांपैकी काहींचे क्षेत्रफळ ५०० यार्ड ते ७ हजार चौरस यार्ड असल्याचे खरेदी-विक्रीपत्रातील मजकुरावरून लक्षात येते.
औरंगाबाद हे शहर निजामशाहीचा वजीर मलिक अंबर याने १६१७ साली वसवले. उंच इमारती बांधण्याचा वारसा त्याच्यापासून औरंगाबादला मिळाला. याचा वारसा तत्कालीन इतिहासात नमूद आहे. शाहजादा शाहजहांबरोबर मिर्जा सादिक आसफहानी नावाचा सेनानी जुन्नर येथे होता. तो औरंगाबादेत (तेव्हाचे खडकी) आला. त्यावेळी त्याने या शहराचे वर्णन लिहून ठेवले आहे. तो म्हणतो, हे शहर मलिक अंबरने वसविले आहे. येथील इमारती इतक्या उंच आहेत की, त्या आकाशाला भिडल्या आहेत, असा भास होतो. जहांगीर बादशहानेही हे शहर अत्यंत सुंदर असून ते वसवण्यास मलिक अंबरला २० वर्षे लागली, अशी नोंद आत्मचरित्रात केली आहे.
सर्वार्थाने सुरक्षित शहर
मध्ययुगात दिल्ली, आग्रा, पटना, सुरत, बऱ्हाणपूर, विजापूर, बीदर, गोलकोंडा ही अशी शहरे होती; परंतु तिथेही चार मजल्यांहून अधिक उंचीच्या इमारती नव्हत्या, असे इतिहासतज्ज्ञांचे मत आहे. औरंगाबादला तर १८ व्या शतकाच्या प्रारंभापर्यंत कोणताच धोका नव्हता. फार मोठे, भरभराटीला आलेले व्यापारी शहर व त्यातून मुगल साम्राज्याचा दख्खन सुभ्याचे ठाणे म्हणून ते अधिक सुरक्षित बनवण्यात आले होते. या शहराला कोट, परकोट असे अनेक थरांचे रक्षण होते. त्यामुळे भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वांत उंच इमारती येथे सर्वांत आधी बांधल्या जाऊ शकल्या.
१७ व्या शतकात शहरात ४ ते ९ मजली इमारती होत्या. त्याचे पुरावे डॉ. शेख रमजान यांनी अनेक वर्षांच्या पाठपुराव्यानंतर त्या इमारतींची अस्सल खरेदी-विक्रीपत्रे जमविली आहेत.
नऊ मजली :
१७२७ मध्ये अब्दुल वाहीदबीन सआदतमंद व बबकाबीबी सआदतमंद यांनी बेगमपुऱ्यातील ९ मजली इमारत तुर्कताज खान बहादूरबीन एक्काताज खानबीन शहा मोहंमद अवगलान यांना विकली. खरेदीदाराचे वकील हाजी मोहंमद अली खान बीन हाजी अबुल फत्ता हे होते. (सर्व खरेदी-विक्रीपत्रे पारशी भाषेत असून त्यांचे हिंदीत भाषांतर मौलाना इजीलाल अहेमद यांनी केले.)
सात मजली इमारत :
सुरबाजीचा नातू व बायाजीचा मुलगा राणुजी याने अब्दुल्ला खानचा नातू व अहउल्लाहखानचा मुलगा बर्कअंदाज खाँ याला १७१९ मध्ये बेगमपुरातील सात मजली इमारत विकली.
चार मजली इमारत :
1ख्वाजा अब्दुल गणी यांची मुलगी खानमजान हिने आपली मुगलपुऱ्यातील चार मजली इमारत भेट दिली. मुहर काजी शेख उल इस्लाम, वकील मीर ख्वाजा अब्दुला.
2ख्वाजा अब्दुल खलीफ याची मुलगी खासाबीबी हिने आपली आजमगंज येथील चार मजली इमारत विकली. मुहर आसिक जाही निजाम उलू मुस्क. इ.स. १७४४.