हिंगोलीने बदलल्या राज्यातील आरोग्य केंद्रांच्या कार्यकक्षा

By Admin | Updated: July 24, 2014 00:28 IST2014-07-24T00:04:28+5:302014-07-24T00:28:39+5:30

हिंगोली : एका प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील गावांचा दुसऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यकक्षेत समावेश करण्याचे अधिकार राज्य शासनाने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनाच दिले आहेत.

Workshop on health centers of the changed state of Hingoli | हिंगोलीने बदलल्या राज्यातील आरोग्य केंद्रांच्या कार्यकक्षा

हिंगोलीने बदलल्या राज्यातील आरोग्य केंद्रांच्या कार्यकक्षा

हिंगोली : एका प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील गावांचा दुसऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यकक्षेत समावेश करण्याचे अधिकार राज्य शासनाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनाच दिले आहेत. विशेष म्हणजे, यासंदर्भात हिंगोली जिल्हा परिषदेने प्रस्ताव पाठविल्यानंतर हा निर्णय राज्यभरासाठी लागू करण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेंतर्गत येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या गावांपासूनचे अंतर व त्या कार्यकक्षेत येणाऱ्या गावांचे अंतर यामध्ये पूर्वीच्या रचनेप्रमाणे अधिक होते. त्यानंतरच्या कालावधीत त्याच गावाच्या परिसरात दुसरे प्राथमिक आरोग्य केंद्र असताना जुन्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यकक्षेची पुनर्रचना केली नसल्याने अनेक गावांना जवळपास ४० ते ५० कि.मी.अंतर पार करून त्या प्राथमिक आरोग्य केंद्रांत जावे लागत असे. त्यामुळे अनेक ग्रामस्थांची गैरसोय होत होती. हिंगोली जिल्हा परिषदेने एका प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील गावाचा दुसऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यकक्षेत समावेश करावा. जेणेकरून ग्रामस्थांची सोय होईल, असा प्रस्ताव हिंगोली जिल्हा परिषदेने राज्य शासनाकडे सादर केला होता. या प्रस्तावाला मंजुरी देत राज्य शासनाने २१ जुलै रोजी हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील पिंपराळा या गावाचा कुरूंदा आरोग्य केंद्रात समावेश केला. त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यकक्षा ठरविण्याचा थेट अधिकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनाच देण्याचा निर्णय २१ जुलै रोजीच घेण्यात आला. यापूर्वी हा अधिकार राज्य शासनाकडे होता. याबाबत २१ रोजी काढलेल्या आदेशात हा अधिकार जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना प्रदान करताना ५ अटी घालण्यात आल्या आहेत. त्यामध्ये समर्थनिय कारणाशिवाय असे बदल करण्यात येऊ नये, यासाठी संबंधित गावाच्या ग्रामसभेमध्ये तसेच संंबंधित जि. प. च्या सर्वसाधारण सभेत याबाबतचा बहुमताने ठराव मंजूर होणे आवश्यक आहे. हा प्रस्ताव जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत जि. प. सीईओंना सादर करण्यात यावा. मान्यतेनंतर झालेल्या बदलासंदर्भात वेळोवेळी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी आरोग्य संचालनालयास माहिती कळवावी व या पूर्वी शासनास प्राप्त झालेल्या अनिर्णीत प्रस्तावांना जि.प.सीईओंनी मंजुरी द्यावी, यांचा समावेश आहे.
शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील पिंपळगाव कुटे, डोणवाडा, सुकळी, कुरूंदवाडी, गणेशपूर, दगडगाव, म्हातारगाव, कौडगाव, बळेगाव, विरेगाव, लोळेश्वर, चोंढी तांडा, पिंपराळा, बोरगाव खु. या चौदा गावांना लाभ होणार आहे. तसेच हिंगोली तालुक्यातील बोराळा, बोराळवाडी, आंधारवाडी, जोडतळा, सायाळ, बेलवाडी, लासिना, माळधामणी, नवखा, कोथळज अशा १० गावांना लाभ होणार आहे. या निर्णयाचा सर्वाधिक लाभ औंढा नागनाथ तालुक्यातील ५९ गावांना मिळणार आहे. त्यामध्ये दरेगाव, सिद्धेश्वर, ढेगज, वडचूना, दूरचुना, भोसी, पाझरतांडा, सावंगी मु., नांदगाव, गांगलवाडी, बरगेवाडी, पातळी, नंदगावतांडा, येहळेगाव, दुधाळा, काशीतांडा, काळापाणी तांडा, सावळी तांडा, नागझरी, नागझरीतांडा, रामेश्वर, पार्डी, दौडगाव, सावळी खुर्द, केळी, साळणा, हिवरखेडा, येळी,केळी तांडा, पिंपरी जोड, सेंदुरसना, सारंगवाडी, गोजेगाव, रूपूर, रूपूरतांडा, सिद्धेश्वर कॅम्प, धार, चिमेगाव, भगवा, कामठा, जडगाव, बोरजा, हिवरा जाटू, पिंपळा, उखळी, उंडेगाव, जलालपूर, लांडाळा, चिंचोली, पोटा बु., अनखळी, एकबुर्जेवाडी, नालेगाव, पेरजाबाद, नांदखेडा, बेरूळा या गावांचा समावेश आहे. तसेच कळमनुरी तालुक्यातील भोनेश्वर, भुरकेवाडी, पावनमारी, मुंढळ, रामवाडी, कनका, राजुरा या सात गावांना लाभ होणार आहे. सेनगाव तालुक्यातील ५१ गावांनाही याचा लाभ होणार आहे. त्यामध्ये धोतरा, बोरखेडी पि., घोरदरी, नानसी, बाभणी, सोनसावंगी, पाटोदा, लिंबाळा तांडा, लिंबाळा, आमदरी, येलदरी, चिंचखेडा, भंडारी, खैरी, होलगिरा, चिलागर, तांदुळवाडी, बोडखा, लिंबाळा हुडी, हुडी, ब्रम्हवाडी, उमरदरी, जामदया, गोंडाळा, लिंगदरी, वडहिवरा, जाब आंध, तळणी, रिधोरा, खुडज, जांभरूण बु., चांगेफळ, मकोडी, बरडा, भानखेडा, पानकनेरगाव, सुलदली, साबरखेडा, खैरखेडा, सिनगी खांबा, वरूड चक्रपान, म्हाळसापूर, कवरदडी, जयपूर, कहाकर खुर्द, वेलतुरा, शिवणी बु.,खु, पार्डी, देऊळगाव, कोंडवाडा या गावांचा समावेश आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
जिल्ह्यातील १४१ गावांना होणार लाभ
वसमत तालुक्यातील १४, हिंगोली तालुक्यातील १०, कळमनुरी तालुक्यातील ७ गावांच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये होणार बदल.
औंढा नागनाथ तालुक्यातील तब्बल ५९ व सेनगाव तालुक्यातील ५१ गावांच्या आरोग्य केंद्रामध्ये होणार बदल.
साळणा, शिरडशहापूर व हट्टा प्राथमिक आरोग्य केंद्र मिळून जवळा बाजार येथे ग्रामीण रूग्णालय स्थापन करण्याचा शासनाकडे प्रस्ताव.
आरोग्य केंद्रांच्या कार्यकक्षा बदलण्याचा अधिकार जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आल्याने ग्रामस्थांची गैरसोय दूर होणार.
आरोग्य केंद्रांच्या कार्यकक्षा बदलण्याचा प्रस्ताव हिंगोली जिल्हा परिषदेने महाराष्ट्र शासनाला ४ मार्च २०१४ रोजी पाठविला होता.
या प्रस्तावामुळे राज्यभर जि.प.सीईओंना देण्यात आले बदलाचे अधिकार.

Web Title: Workshop on health centers of the changed state of Hingoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.