कार्यकर्त्यांबरोबरच प्रचारासाठी वाहनेही मिळेनात !
By Admin | Updated: September 29, 2014 00:38 IST2014-09-29T00:13:20+5:302014-09-29T00:38:21+5:30
रवी गात , अंबड युती व आघाडीतील ताटातुटीनंतर चारही प्रमुख पक्ष, काही बंडखोर व इतर राजकीय पक्षांचे उमेदवार अशी बहुरंगी निवडणूक जवळपास विधानसभा मतदारसंघांमध्ये होत आहे.

कार्यकर्त्यांबरोबरच प्रचारासाठी वाहनेही मिळेनात !
रवी गात , अंबड
युती व आघाडीतील ताटातुटीनंतर चारही प्रमुख पक्ष, काही बंडखोर व इतर राजकीय पक्षांचे उमेदवार अशी बहुरंगी निवडणूक जवळपास विधानसभा मतदारसंघांमध्ये होत आहे. घनसावंगी व बदनापूर या दोन्ही मतदारसंघात मध्य समजल्या जाणाऱ्या अंबड येथे तर कार्यकर्त्यांबरोबरच खाजगी प्रवाशी वाहने देखील मिळेनासी झाली आहेत. गेल्या दोन दिवसांपासून येथील वाहनतळावर शुकशुकाट आहे.
अंबड शहर व तालुक्यात किरायाने देण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या चारचाकी वाहनांची मोठी संख्या आहे. याशिवाय दररोज ठरलेल्या मार्गावर चालणाऱ्या काळया-पिवळी गाडयांची संख्या वेगळीच. अंबड शहरातील पं. गायनाचार्य गोविंदराव जळगांवकर नाटयगृहाच्या समोर किरायाने देण्यात येणाऱ्या वाहनांचा वाहनतळ आहे. याव्यतिरिक्त शहरातील अन्य ठिकाणीही वाहनतळ आहेत. शहरात सर्व वाहनतळावर मिळून मोठ्या प्रमाणावर किरायाने देण्यात येणाऱ्या वाहनांची संख्या आहे.
वर्षभरात केवळ लग्नसराईत या वाहनमालकांना आपल्या वाहनांचा चांगला किराया मिळतो. एरव्ही किरायाने देण्यात येणाऱ्या वाहनतळावर सध्या शुकशुकाट दिसत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे युती व आघाडी तुटल्याने उमेदवारांची संख्या वाढली आहे. वाढलेल्या उमेदवारांच्या व वाहनांच्या मर्यादित संख्येचा अंदाज घेऊन वाहन मालकांनी वाहनांच्या किरायाचे दर वाढवुन घेतले.
सध्या शहरात किरायाने देण्यात येणाऱ्या वाहनांचा दुष्काळ असुन बहुतांश वाहने घनसावंगी व बदनापुर विधानसभा मतदार संघामध्ये उमेदवारांच्या प्रचाराचा धुराळा उडवताना दिसत आहेत. निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर उमेदवारांपैकी कोणाची दिवाळी कशी असेल हे आज सांगणे आज कठीण असले तरी वाढलेल्या उमेदवारांच्या संख्येमुळे किरायाने वाहन देणाऱ्या वाहनमालकांची सध्या जोरात दिवाळी सुरु आहे एवढे मात्र नक्कीच.