नगर पालिकेवर कामगारांचा मोर्चा
By Admin | Updated: June 18, 2014 01:43 IST2014-06-18T00:49:32+5:302014-06-18T01:43:58+5:30
उस्मानाबाद : विविध मागण्यांसाठी मराठवाडा लाल बावटा कामगार युनियनच्या वतीने मंगळवारी पालिकेवर मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले़

नगर पालिकेवर कामगारांचा मोर्चा
उस्मानाबाद : कामगारांना स्थायित्व प्रमाणपत्र द्यावे, शासन निर्णयाप्रमाणे पदोन्नती देऊन वेतनश्रेणीचा फरक द्यावा आदी विविध मागण्यांसाठी मराठवाडा लाल बावटा कामगार युनियनच्या वतीने मंगळवारी पालिकेवर मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले़ मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात, लाड समितीच्या शिफारशी लागू कराव्यात, सहाव्या वेतन आयोगातील फरकाची उर्वरित रक्कम द्यावी, सेवानिवृत्त किंवा मयत झालेल्या कामगारांच्या वारसांना सेवानिवृत्ती वेतन, उपदानाची रक्कम थकबाकीसह द्यावी, २५ स्त्री सफाई कामगारांना नोकरीत कायम करावे, कामगारांना विविध प्रकारचे साहित्य द्यावे, जीपीएफ स्लीप द्यावी, मासिक वेतनाची स्लीप द्यावी, गत पाच महिन्यापासून रखडलेले वेतन द्यावे, रोजंदारी सेविकांना दिलेला बेकायदेशीर ब्रेक रद्द करावा, झाडू भत्ता द्यावा आदी मागण्या केल्या. आंदोलनात राजेश्री पाटील, सुरवसे, अबई गायकवाड, अंबीका पवार, प्रभाकर कोळी, शहाजी गायकवाड आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)