मजूर बनले कार्यकर्ते
By Admin | Updated: September 28, 2014 01:03 IST2014-09-28T00:33:22+5:302014-09-28T01:03:37+5:30
औरंगाबाद : स्थळ- सिडको एन-२ परिसरातील कामगार चौक. वेळ - सकाळी १० वाजेची. एरव्ही हा चौक कामाच्या शोधात उभ्या असलेल्या शेकडो मजुरांनी गजबजलेला असतो. आज मात्र चौकात शुकशुकाट जाणवत होता.

मजूर बनले कार्यकर्ते
औरंगाबाद : स्थळ- सिडको एन-२ परिसरातील कामगार चौक. वेळ - सकाळी १० वाजेची. एरव्ही हा चौक कामाच्या शोधात उभ्या असलेल्या शेकडो मजुरांनी गजबजलेला असतो. आज मात्र चौकात शुकशुकाट जाणवत होता. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एक जणाकडे सहज चौकशी केली ‘आज गर्दी का नाही रे बाबा, कुठे गेले कामगार’. पटकन तो उत्तरला ‘साहेब, इलेक्शन सुरू आहे ना, समदे गेले मिरवणुकीला, म्या उशिरा आलो म्हणून मला रोजीरोटीसाठी थांबावे लागले.’
विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजला असून, शनिवारी बहुतांश उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज भरला. एरव्ही ठिकठिकाणच्या कामगार चौकात मजूर मोठ्या प्रमाणात उभे असतात; पण आज सर्व कामगार चौक ओस पडले होते.
यात सिडको एन-२ येथील कामगार चौक, पीरबाजारातील कामगार चौक, शहागंजातील चौकात हीच परिस्थिती पाहण्यास मिळाली. अनेक कामगारांना सकाळीच मिरवणुकीत नेण्यात आले होते, त्यांनी कार्यकर्ते म्हणून कार्य केले. निवडणुकीचे दिवस म्हणजे मजुरांसाठी सुगीचे दिवस ठरत आहेत. जे कामगार उशिरा आले त्यांना मात्र, बांधकाम ठेकेदारांची प्रतीक्षा करावी
लागली.
सिडको, सिडकोतील कामगार चौकात सुभाष जोगदंडे नावाच्या मजुराने सांगितले की, यंदा समदे पक्ष स्वतंत्र लढणार आहेत म्हणे, याचा फायदा बी आम्हाला होईल. पीरबाजारातील चौकात मजुरांची कमी संख्या का, असा प्रश्न एका मजुराला विचाराला तेव्हा त्याने अनेक जण विविध पक्षांच्या मिरवणुकीत गेल्याचे सांगितले. एका मजुराने सांगितले की, आता निवडणूक संपेपर्यंत चौकात मजुरांची संख्या कमीच दिसेल. मात्र, असेही काही मजूर आहेत की, ते निवडणूक प्रचारात जात नाहीत, ते बांधकामाचे काम करतात.