स्त्री रूग्णालयाचे काम अद्यापही अपूर्णच
By Admin | Updated: October 29, 2014 00:44 IST2014-10-29T00:31:37+5:302014-10-29T00:44:10+5:30
उस्मानाबाद : महिला रूग्णांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या स्त्री रूग्णालयाचे बांधकाम सहा वर्षाचा कालावधी लोटला तरी अद्यापही सुरूच आहे़ पहिल्या टप्प्यातील इमारतीचे मुख्यमंत्री,

स्त्री रूग्णालयाचे काम अद्यापही अपूर्णच
उस्मानाबाद : महिला रूग्णांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या स्त्री रूग्णालयाचे बांधकाम सहा वर्षाचा कालावधी लोटला तरी अद्यापही सुरूच आहे़ पहिल्या टप्प्यातील इमारतीचे मुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते दोन वर्षापूर्वी उद्घाटन करण्यात आले होते़ मात्र, दोन वर्षानंतरही वाढीव टप्प्यातील काम पूर्ण न झाल्याने जिल्हा रुग्णालयात महिला रूग्णांची हेळसांड मात्र कायम आहे़
उस्मानाबाद येथील जिल्हा रूग्णालयात दररोज उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांची संख्या मोठी आहे़ जिल्हा रूग्णालयात २६५ खाटांची सुविधा असताना उपचारासाठी दाखल होणाऱ्या रूग्णांची संख्या ३०० च्याही वर जावू लागली आहे़ ही बाब लक्षात घेता उस्मानाबाद येथे महिला रूग्णांसाठी स्वतंत्र असे ६० खाटांचे स्त्री रूग्णालयास मंजुरी मिळाली होती़ प्रारंभी या कामास ५ कोटी २२ लाख २४ हजार रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता़ मात्र, रूग्णांची संख्या पाहता नंतरच्या टप्प्यात वाढीव ४० खाटांच्या बांधकामासाठी २ कोटी ५५ लाख ३७ लाख रूपयांचा निधी मिळाला होता़
१० डिसेंबर २०१२ रोजी पहिल्या टप्प्यातील ६० खाटांच्या इमारतीचे व निवासस्थानाचे बांधकाम सुरू करण्यात आले होते़ पहिल्या टप्प्यात रूग्णालय इमारत व तीन व चार प्रकारचे निवासस्थानाचे काम पूर्ण झाल्यानंतर आॅक्टोबर २०१२ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी यांच्या हस्ते या इमारतीचे उद्घाटनही करण्यात आले होते़ त्यानंतर मात्र, हे काम वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी पाठपुरावा केल्याचे दिसत नाही़ येथील एक व दोन प्रकारचे निवासस्थानाचे काम रखडले आहे़ वाढीव ४० खाटाच्या इमारतीचे काम २०१२ मध्ये सुरू करण्यात आले होते़
जवळपास दोन वर्षाचा कालावधी लोटला तरी अद्याप किरकोळ काम रखडले आहे़ इमारतीतील दरवाजे, खिडक्या बसविण्यासह रंगरंगोटी करण्यात येत असल्याचेही सांगितले जाते़ मात्र, २००८ ते आजवरचा कालावधी पाहिला असता सहा वर्षाच्या कालावधीतही हे काम अद्याप पूर्ण झाल्याचे दिसत नाही़ जिल्हा रूग्णालयाकडून काही साहित्य या रूग्णालयात अणून टाकण्यात आले असले तरी इमारत वापरात नसल्याने हे साहित्यही कुलूपबंद अवस्थेत धूळखात पडले आहे़ वेळोवेळच्या अधिकाऱ्यांसह संबंधित विभागानेही इमारतीचे काम वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी पाठपुरावा केल्याचे दिसत नाही़ इमारतीचे काम रखडल्याने जिल्हा रूग्णालयातील अडचणींचा सामना करीत महिला रूग्णांना उपचार घ्यावे लागत आहेत़ (प्रतिनिधी)