उत्तरपत्रिका तपासणीचे काम रेंगाळले
By Admin | Updated: December 1, 2014 01:25 IST2014-12-01T01:09:33+5:302014-12-01T01:25:54+5:30
जिल्ह्यांच्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेल्या मूल्यांकन केंद्रात उत्तरपत्रिका तपासणीचे काम रेंगाळले आहे.

उत्तरपत्रिका तपासणीचे काम रेंगाळले
औरंगाबाद : पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या उत्तरपत्रिका मूल्यांकनासाठी संलग्नित महाविद्यालयांचे काही शिक्षक व प्राचार्यांनी जाणीवपूर्वक असहकार्याची भूमिका घेतल्यामुळे विद्यापीठ तसेच विद्यापीठ कार्यक्षेत्रातील जिल्ह्यांच्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेल्या मूल्यांकन केंद्रात उत्तरपत्रिका तपासणीचे काम रेंगाळले आहे. परीक्षा मंडळाच्या निर्णयानुसार असहकार्याची भूमिका घेणारे शिक्षक व प्राचार्यांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी दिला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामार्फत नोव्हेंबर महिन्यात संलग्नित महाविद्यालयांतील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेण्यात आल्या आहेत. ‘महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ मधील कलम ७२’ अन्वये कोणत्याही परिस्थितीत परीक्षेच्या शेवटच्या दिवसापासून ३० दिवसांच्या आत निकाल जाहीर करणे बंधनकारक आहे. यासंबंधी २३ सप्टेंबर रोजी झालेल्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत परीक्षा प्रक्रिया ही तातडीचे काम समजून संलग्नित महाविद्यालयांतील शिक्षक व प्राचार्यांनी या कामात टाळाटाळ करू नये.दरम्यान, सद्य:स्थितीत अनेक महाविद्यालयांकडून उत्तरपत्रिका तपासणीच्या कामासाठी शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आलेले नाही. उत्तरपत्रिका मूल्यांकनाची जबाबदारी सोपविण्यात आलेल्या शिक्षकांवर प्राचार्यांकडून अन्य कामे सोपविली जात आहेत. त्यामुळे ते उत्तरपत्रिका मूल्यांकनासाठी शिक्षकांना केंद्रांवर जाणे शक्य होत नाही, अशी माहिती विद्यापीठास दिली जात आहे. जे शिक्षक उत्तरपत्रिका मूल्यांकनाकडे पाठ फिरवीत आहेत. त्या महाविद्यालयांच्या प्राचार्यांविरुद्ध विद्यापीठामार्फत कडक कारवाई कारवाई करण्याचा निर्णय आता विद्यापीठाने घेतला आहे. यासंबंधीचे परिपत्रकच विद्यापीठाने सर्व संलग्नित महाविद्यालयांच्या प्राचार्यांना पाठविले आहे.