दुष्काळातही मजुरांच्या हाताला नसणार काम
By Admin | Updated: November 28, 2014 01:12 IST2014-11-27T23:42:15+5:302014-11-28T01:12:37+5:30
विलास भोसले; पाटोदा महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या नियम आणि निकषाप्रमाणे पूर्वीची अर्धवट अवस्थेत कामे असतील तर त्या गावात नव्याने काम सुरू करता येणार नाही.

दुष्काळातही मजुरांच्या हाताला नसणार काम
विलास भोसले; पाटोदा
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या नियम आणि निकषाप्रमाणे पूर्वीची अर्धवट अवस्थेत कामे असतील तर त्या गावात नव्याने काम सुरू करता येणार नाही. या ग्रामपंचायत अंतर्गत पाच किंवा त्यापेक्षा जास्त कामे अर्धवट आहेत तेथे नवीन कामे सुरू होणार नसल्याने ऐन दुष्काळात मजुरांना काम मिळणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
महाराष्ट्रातील रोजगार हमी योजना कामाच्या माध्यमातून सार्वजनिक विकास आणि मजुरांना काम मिळत असल्याने तत्कालिन केंद्र सरकारने महाराष्ट्राची योजना देशभर राबविण्याचा निर्णय घेतला. महात्मा गांधी रोजगार हमी योजना या नावाने ही योजना सुरू करून शंभर दिवसांच्या रोजगाराची हमी दिली. २००८ पासून केंद्राची योजना राज्यात सुरू झाली. पाटोदा तालुक्यात या योजनेअंतर्गत सुमारे पाच हजार कामे सुरू करण्यात आली. यामध्ये विहीर, रस्ते, रोपवाटिका, वृक्षलागवड, वृक्ष संवर्धन, तलावातील गाळ काढणे, अशा स्वरुपाच्या कामांचा समावेश आहे.
तालुक्यात मोठ्या प्रमाणात कामे सुरू झाल्यानंतर या कामात मजुरांच्या नावाने पोस्टात खाते उघडण्यापासून बोगस कारभाराच्या तक्रारी झाल्या. त्यामुळे तालुक्यातील अनेक कामे अर्धवट राहिली व बेरोजगारांच्या संख्येत वाढ झाली. या कामाच्या माध्यमातून तालुक्यातील हजारो बेरोजगारांच्या हाताला काम लागले होते. मात्र तक्रारीअंती ही कामे अर्धवट अवस्थेत राहिली. यामध्ये व्यक्तीगत लाभाच्या विहिरीच्या कामाबाबत मोठ्या प्रमाणात अनियमितता दिसून आली.
शासन नियमानुसार नवीन कामे सुरू करण्यात अडचण निर्माण झाल्याने तत्कालिन जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांनी सुमारे चार हजार कामे आहे त्या स्थितीत पूर्ण दाखवा, असे आदेश काढून नव्याने कामे सुरू करण्यासाठी मार्ग काढला. यापूर्वीही तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतीअंतर्गत सुमारे १ हजार कामे अर्धवट आहेत. ज्या ग्रामपंचायतींकडे पाचपेक्षा जास्त कामे अर्धवट आहेत. तेथे नवीन कामे न घेण्याच्या निर्देशामुळे नव्याने मान्यता बंद आहेत.
सध्या तालुक्यातील सर्वसाधारणपणे एका ग्रामपंचायतकडे दहा ते वीस कामे अर्धवट आहेत. त्यामुळे नवीन काम मिळणार की नाही याबाबत साशंकता आहे. परिणामी नवीन कामाबाबत प्रशासनाकडे आढावा अथवा सूचना किंवा प्रस्तावित कामेच नाहीत. या पलिकडे एखादे काम सुरू करायचे असल्यास त्या कामास रोजगार हमी योजना उपजिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली तरच कामे सुरू करता येतात, असे नाव न छापण्याच्या अटीवर एका जबाबदार अधिकाऱ्याने सांगितले.
या योजनेअंतर्गत तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या संख्येंनी कामे सुरू झाली होती. यामध्ये विहिरी, रस्ते, रोपवाटिका, वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन, तलावातील गाळ काढणे आदी कामांचा समावेश होता. त्यामुळे दुष्काळजन्य परिस्थितीतही लोकांच्या हाताला काम होते. मात्र या योजनेचे बदलते निकष पाहता यंदा दुष्काळी परिस्थितही कामे मिळणार की नाही याबाबत शंका आहे. त्यामुळे तालुक्यातील लोकांवर बेरोजगारीचे संकट उभे आहे.