२ महिन्यांपासून मानधनाविना काम

By Admin | Updated: August 20, 2014 23:55 IST2014-08-20T23:37:11+5:302014-08-20T23:55:56+5:30

हिंगोली : उन्हातान्हात गावागावात जाऊन काम करणाऱ्या पाणलोट व्यवस्थापनातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनाचे नेहमीच वांधे होत आहेत.

Work for no less than 2 months | २ महिन्यांपासून मानधनाविना काम

२ महिन्यांपासून मानधनाविना काम

हिंगोली : उन्हातान्हात गावागावात जाऊन काम करणाऱ्या पाणलोट व्यवस्थापनातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनाचे नेहमीच वांधे होत आहेत. महिना दोन महिन्याआड उद्भवणाऱ्या या प्रश्नाचे मूळ खुद्द कर्मचाऱ्यांनाही समजले नाही. आधीच तुटपूंजे मानधन तेही वेळेवर मिळत नसल्यामुळे बुधवारी कर्मचाऱ्यांनी उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांकडे व्यथा मांडली.
एकात्मीक पाणलोट व्यवस्थापनतंर्गत मागील तीन वर्षांपासून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना मिळणारे तुटपूंजे मानधनही वेळेवर मिळत नाही. अलिकडच्या सहा महिन्यांत हा प्रश्न नित्याचाच झाला आहे. दोन महिन्यांपूर्वी तीन महिन्यांचे एकदाच मानधन मिळाले होते. तत्पूर्वी कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांसमोर गाऱ्हाणे मांडावे लागले. आताही तोच कित्ता गिरवावा लागण्याची चिन्हे आहेत. स्वतंत्र विभाग असतानाही मानधनात आडकाठी येत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला. महिन्याभरापासून तंत्र अधिकारी भंडारी यांच्या कार्यालयात कर्मचारी खेटे घालत आहेत; परंतु अद्याप कर्मचाऱ्यांना न्याय मिळालेला नाही. गत आठवड्यात संपामुळे तंत्र अधिकारी कर्मचाऱ्यांना भेटले नाहीत. उर्वरित वेळेत इतर कारणे कर्मचाऱ्यांना सांगितली जातात. वेतनाविना कर्मचाऱ्यांचे कामात लक्ष लागत नाही. घरखर्च भागवणेही अवघड झाले आहे. शिवाय प्रत्येक महिन्यात मानधनाला उशीर होत असल्याने कंटाळलेल्या कर्मचाऱ्यांनी उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांकडे धाव घेवून मानधनाची मागणी केली. (प्रतिनिधी)
अधिऱ्यांच्या बोलण्यात तफावत
कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार महिन्याच्या ४ तारखेला मानधन देण्याचे आदेश लातूर येथील विभागीय कार्यालयाने हिंगोली येथील तंत्र अधिकाऱ्यांना दिले आहेत; मात्र लेखी मिळाले नसल्यामुळे ९ तारखेच्या पुढेच वेतन केले जात आहे; परंतु याचा दोन महिन्याच्या मानधनाशी अर्थाअर्थी संबंध नसल्याचे कर्मचारी म्हणाले.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी पवार यांनी लातूर विभागातून निधी दिला नसल्यामुळे वेतन झाले नसल्याचे सांगितले; पण याच विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णा शिपकुले यांनी कर्मचाऱ्यांच्या मानधनासाठी जिल्ह्यास निधी दिली जात असल्याचे सांगितले. प्रत्येक महिन्याला विभागीय कार्यालयातून मानधन देण्याचा संबंध नाही. स्वतंत्र विभाग आणि मानधनाचे अधिकारही जिल्हा कृषी विभागास असल्याचे शिपकुले म्हणाले. दुसरीकडे तंत्र अधिकारी भंडारी यांनी जुलै महिन्याचे मानधन काढले असल्याचे सांगितले. प्रत्यक्षात मानधन मिळाले नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

 

Web Title: Work for no less than 2 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.