नगर पालिका कर्मचाऱ्यांचा संप सुरू

By Admin | Updated: July 16, 2014 01:26 IST2014-07-16T00:07:34+5:302014-07-16T01:26:45+5:30

जालना : जिल्ह्यात जालना, अंबड, भोकरदन व परतूर नगर पालिकांमधील कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी मंगळवारपासून बेमुदत संप सुरू केला आहे

The work of municipal employees started | नगर पालिका कर्मचाऱ्यांचा संप सुरू

नगर पालिका कर्मचाऱ्यांचा संप सुरू

जालना : जिल्ह्यात जालना, अंबड, भोकरदन व परतूर नगर पालिकांमधील कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी मंगळवारपासून बेमुदत संप सुरू केला आहे. त्यामुळे आज पहिल्याच दिवशी या चारही पालिकांमधील कामकाज पूर्णत: बंद होते. परिणामी नागरी सेवेवर त्याचा परिणाम झाला आहे.
पालिका कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी नगर परिषद कर्मचारी/संवर्ग कर्मचारी संघटनेच्या वतीने नुकताच जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाही काढण्यात आला होता. तत्पूर्वी धरणे आंदोलनही करण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांकडून मागण्या मान्य होईपर्यंत आमचा संप सुरूच राहिल, असे संघटनेचे अध्यक्ष राजाराम गायकवाड यांनी म्हटले आहे. या संपाला सीटू कामगार संघटनेच्या वतीने अण्णा सावंत, मधुकर मोकळे, हरिश्चंद्र लोखंडे, संतोष निकम, डी.टी. पाटील आदींनी पाठिंबा जाहीर केलेला आहे.
कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने पाणीपुरवठा व अग्निशमन सेवा ठप्प होती. शहरात काही भागात आज पाणी सोडण्यात येणार होते, मात्र या संपामुळे पाणीपुरवठा झाला नसल्याचे संघटनेच्या सूत्रांनी सांगितले. जिल्ह्यात संपाला शंभर टक्के प्रतिसाद मिळाल्याचा दावाही संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
नगरपालिका कार्यालयात कामानिमित्त आलेल्या नागरिकांना रिकाम्या हाताने परतावे लागले. कर्मचाऱ्यांनी कार्यालय परिसरात धरणे देऊन निदर्शनेही केली. पालिकेतील अधिकाऱ्यांचीही या संपामुळे गैरसोय झाल्याचे चित्र दिसून आले.
जालना पालिकेत राजाराम गायकवाड, केशव कानपुडे, आनंद मोहिते, विजय फुलंब्रीकर, संजय भालेराव, सुरेश गंगासागरे, रंजना कुलकर्णी, हरूण बेग, कांचन शेळके, राजू मोरे, चंद्रकांत खनपटे, गोपाल चौधरी, अशोक लोंढे, रामचंद्र पानवाले आदी सहभागी झाले होते. भोकरदन, अंबड व परतूर येथेही कर्मचाऱ्यांनी पालिका कार्यालयासमोर निदर्शने केली. कामकाज बंद असल्याने अनेकांची पंचाईत झाली. (प्रतिनिधी)

Web Title: The work of municipal employees started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.