कोल्हापुरी बंधाऱ्याचे काम रखडले
By Admin | Updated: June 21, 2014 00:50 IST2014-06-20T23:47:42+5:302014-06-21T00:50:16+5:30
अतुल शहाणे, पूर्णा तालुक्यातील महागाव-निळा शिवारातील पूर्णा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्याचे बांधकाम निधीअभावी अनेक वर्षांपासून रखडले आहे.
कोल्हापुरी बंधाऱ्याचे काम रखडले
अतुल शहाणे, पूर्णा
तालुक्यातील महागाव-निळा शिवारातील पूर्णा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्याचे बांधकाम निधीअभावी अनेक वर्षांपासून रखडले आहे. त्यामुळे या परिसरातील सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
तालुक्यातील महागाव-निळा शिवारातील पूर्णा नदीवर २००९ साली कोल्हापुरी बंधाऱ्याच्या कामास सुरुवात झाली. पाच ते सहा वर्षे उलटूनही या बंधाऱ्याचे काम केवळ ८० टक्केच झाले आहे. या बांधकामासाठी शासनाकडून अतिरीक्त निधी उपलब्ध होत नसल्याने बंधाऱ्याचे काम रखडले आहे.
बंधाऱ्याची उंची साडेचार मीटर एवढी करण्यात येणार आहे. यामुळे पूर्णा तालुक्यातील ९०० हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. यामध्ये निळा ४०० हेक्टर, कळगाव १०० हेक्टर, महागाव १०० हेक्टर, कंठेश्वर १०० हेक्टर, आजदापूर १०० हेक्टर तर कानडखेड या परिसरातील काही भाग सिंचनाखाली येणार आहे. तसेच अनेक गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी संपुष्टात येणार आहे. परंतु शासनस्तरावरून या कोल्हापुरी बंधाऱ्यासाठी अतिरिक्त निधीची व्यवस्था करता येत नसल्याने हे काम रखडले आहे.
पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष
महागाव-निळा शिवारात कोल्हापुरी बंधाऱ्याचे बांधकाम ८० टक्के पूर्ण झाले आहे. अद्यापही पिलर, बंधाऱ्याच्या प्लॅपचे काम रखडले आहे. या बांधकामासाठी लागणारे साहित्य धूळखात आहे. निळा ग्रामपंचायतीने या बंधाऱ्याचे उर्वरित बांधकाम तत्काळ करावे, अशी मागणी परभणी पाटबंधारे विभागाकडे दोन वेळा लेखी निवेदन देऊन केले होते. मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे.
लघूपाटबंधारे विभागांतर्गत या बंधाऱ्यास नाबार्डमार्फत दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. सध्या या बंधाऱ्याचे काम शेवटच्या टप्प्यात आले असून सुधारित प्रस्तावित मंजुरीसह शासनाकडून अतिरिक्त निधी उपलब्ध झाल्यास या बंधाऱ्याचे काम पूर्ण होईल.
पाण्याचा उपयोग होईना
पूर्णा तालुक्यातून वाहणारी पूर्णा नदी पावसाळ्यात दुथडी भरून वाहते. परंतु बंधाऱ्यात दीड ते दोन कि.मी. अंतरावर कंठेश्वर परिसरात गोदावरी नदीच्या पात्रात मिळते. परंतु या बंधाऱ्यात कोल्हापुरी बंधारा नसल्याने पावसाचे पाणी इतर जिल्ह्यात वाहूून जाते. त्यामुळे या पाण्याचा शेतकऱ्यांना उपयोग होत नाही.