बँक कर्मचाऱ्यांचे फिती लावून काम
By Admin | Updated: October 11, 2014 00:39 IST2014-10-11T00:13:10+5:302014-10-11T00:39:08+5:30
औरंगाबाद : राष्ट्रीयीकृत बँकांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी काळ्या फिती लावून आपले कामकाज केले.

बँक कर्मचाऱ्यांचे फिती लावून काम
औरंगाबाद : राष्ट्रीयीकृत बँकांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी काळ्या फिती लावून आपले कामकाज केले. कारण, केंद्र शासन व इंडियन बँक असोसिएशनने पगारवाढीचा निर्णय लोंबकळत ठेवला आहे. ११ टक्क्यांपेक्षा अधिक पगारवाढ करण्यास केंद्र शासन तयार नसल्याने याचा निषेध व्यक्त करण्यासाठी काळी फीत प्रत्येकाने बांधली होती.
शुक्रवारी सकाळी बँक उघडली तेव्हा सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांनी काळी फीत लावली होती. हे पाहून ग्राहकांना आश्चर्याचा धक्काच बसला. मात्र, नंतर सर्व परिस्थिती लक्षात आली. जिल्ह्यातील २६ राष्ट्रीयीकृत बँकांच्या सुमारे ५ हजार कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून केंद्र सरकारचा निषेध केला.
यासंदर्भात अखिल भारतीय स्टेट बँक आॅफ हैदराबाद स्टाफ असोसिएशनचे महासचिव जगदीश भावठाणकर यांनी सांगितले की, बँक कर्मचारी, अधिकाऱ्यांना २५ टक्के वेतनवाढ करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे.
यासंदर्भात इंडियन बँक असोसिएशन व युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन यांच्या आजपर्यंत १३ बैठका झाल्या. मात्र, केंद्र शासनाच्या वतीने इंडियन बँक असोसिएशनने अधिक पगारवाढ करण्यास असमर्थता दर्शविली. कर्मचारी व अधिकाऱ्यांची संघटना युनायटेड फोरम आॅफ बँक युनियनने २५ ऐवजी २३ टक्के पगारवाढ करण्यात यावी, अशी मागणी केली. मात्र, केंद्र शासन
ठाम आहे. परिणामी, राष्ट्रीयीकृत बँकांच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांची पगारवाढ झाली नाही. केंद्र सरकारने २३ टक्के पगारवाढ केली नाही, तर पुढील महिन्यात बेमुदत संपावर जाण्याचा इशारा भावठाणकर यांनी दिला.