शब्दरूप आले ‘तिच्या’ मुक्या भावनांना...!
By Admin | Updated: May 27, 2016 00:06 IST2016-05-26T23:50:04+5:302016-05-27T00:06:49+5:30
औरंगाबाद : दु:ख झाले म्हणून मुक्या प्राण्यांना माणसासारखा हंबरडा फोडता येत नाही... वाचा नसल्याने ते शब्दातही व्यक्त करता येत नाही;

शब्दरूप आले ‘तिच्या’ मुक्या भावनांना...!
औरंगाबाद : दु:ख झाले म्हणून मुक्या प्राण्यांना माणसासारखा हंबरडा फोडता येत नाही... वाचा नसल्याने ते शब्दातही व्यक्त करता येत नाही; परंतु त्यांनाही भावना असतात आणि त्या आपल्या परीने व्यक्त करण्याचा ते प्रयत्न करतात, हे गुरुवारी सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयातील दीप्ती या वाघिणीच्या निधनानंतर तिची मुलगी असलेल्या समृद्धीच्या वर्तनावरून दिसून आले.... पिंजऱ्याजवळच सुरू असलेले आईच्या अंत्यसंस्काराच्यावेळी समृद्धीच्या जिवाची अक्षरश: घालमेल सुरू होती. अंत्यसस्कार होईपर्यंत पिंजऱ्याच्या कठड्यावर दोन पायावर उभा राहून समृद्धीने आपल्या आईला अखेरचा निरोप दिला...
११ वर्षांपासून येथील सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयात असलेल्या दीप्ती या वाघिणीचे गुरुवारी सकाळी निधन झाले. तिचा जोडीदार असलेला गुड्डूही चार महिन्यांपूर्वीच जगातून निघून गेला होता. दीप्ती आणि गुड्डू या जोडीची सिद्धार्थ आणि समृद्धी ही दोन पिल्ले सध्या सिद्धार्थमध्येच आहेत. हे सर्व कुटुंब एकाच पिंजऱ्यात वास्तव्यास होते.
चार महिन्यांपूर्वी पितृ आणि पाठोपाठ गुरुवारी मातृ छत्र हरवल्याचे दु:ख सिद्धार्थ आणि समृद्धीला झाले. मातेचे निधन झाल्यानंतर त्या दोघांपैकी समृद्धीच्या जिवाची सकाळपासूनच पिंजऱ्यात घालमेल सुरू असल्याचे दिसून आले. ती उदास होऊन पिंजऱ्यात नुसत्या येरझारा मारत होती.
उद्यान प्रशासनाने सर्व प्रक्रिया केल्यानंतर प्राणिसंग्रहालय अधीक्षक यांच्या कार्यालयासमोर वाघांच्या पिंजऱ्यालगतच्या जागेत अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. आईला तिकडे नेण्यात येत असल्याचे दिसताच समृद्धीने अंत्यसंस्कार होत असलेल्या दिशेला धाव घेतली. आईचे अंतिम दर्शन घेण्यासाठी समृद्धी पिंजऱ्याच्या सुरक्षा कठड्यावर पाय ठेवून मातेच्या शवाकडे एकसारखी पाहत उभी राहिली. अंत्यसंस्कार होईपर्यंत समृद्धी तेथेच उभी होती. हे सगळे दृश्य पाहिल्यानंतर मनपाच्या अधिकारी आणि पशुवैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांसह उपस्थित कर्मचाऱ्यांचे मनही हेलावले. नंतर तिने तासभर त्या भिंतीवरून चकरा मारून आईचे अंत्यदर्शन घेतले. मग भिंतीवरून उडी मारून ती पिंजऱ्यातील झाडाखाली शांतपणे बसून राहिली.