स्त्रियांच्या लेखनाचा संबंध चारित्र्याशी जोडला जातो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:03 IST2021-09-27T04:03:27+5:302021-09-27T04:03:27+5:30

औरंगाबाद : स्त्रियांना लिखाणाचे स्वातंत्र्य मिळत नाही. पुरुषांच्या सोयीची व्यवस्था असल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. स्त्रियांनी काही लेखन ...

Women’s writing is associated with character | स्त्रियांच्या लेखनाचा संबंध चारित्र्याशी जोडला जातो

स्त्रियांच्या लेखनाचा संबंध चारित्र्याशी जोडला जातो

औरंगाबाद : स्त्रियांना लिखाणाचे स्वातंत्र्य मिळत नाही. पुरुषांच्या सोयीची व्यवस्था असल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. स्त्रियांनी काही लेखन केल्यास त्याचा संबंध चारित्र्याशी जोडण्याची प्रथा आपल्याकडे रुजविण्यात आली आहे. त्यामुळे या व्यवस्थेला उद्ध्वस्त करीत स्त्रीला स्वतंत्रपणे लिहिता येईल, असे वातावरण निर्माण करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन परिसंवादात मान्यवरांनी केले.

मराठवाडा साहित्य संमेलनात प्र.ई. सोनकांबळे व्यासपीठावर आयोजित चौथ्या परिसंवादात सहभागी झालेल्या मान्यवरांनी स्त्रीवादावर चर्चा करताना मराठी लेखिका-कवयित्रींच्या लेखनासंबंधीचे अनेक पदर उलगडून दाखवले. ललिता गादगे यांच्या अध्यक्षेखाली ‘मराठी लेखिका-कवयित्रींचे लेखन स्त्रीवादात अडकले आहे’ या विषयावर परिसंवाद रंगला. या विषयावर बोलताना भगवान काळे, समिता जाधव, योगिनी सातारकर-पांडे, शिवराज गोपाळे, महेश मंगनाळे यांनी विषयांच्या दोन्ही बाजूंनी प्ररखड भाष्य केले. यावेळी काही मान्यवरांनी मराठी लेखिका व कवयित्रींचे लेखन स्त्रीवादात अडकले असल्याची भावना व्यक्त केली, तर काहींनी बंडखोर लेखिका व कवयित्रींचा दाखला देत लेखन स्त्रीवादात अडकल्याची गोष्ट अमान्य केली. स्त्रियांच्या व्यथा व वेदना या स्त्रियांच्या लेखनातून समोर येण्याची गरज काळे यांनी व्यक्त केली, तर सविता जाधव यांनी पुरुषी मानसिकतेच्या समाजात स्त्री मोकळेपणाने लिहू शकत नसल्याचे मत व्यक्त केले. जगभरातील निम्मी लोकसंख्या स्त्रियांची आहे. पण यापैकी किती टक्के स्त्रियांना स्वत:च्या अधिकाराची जाणीव आहे. यापैकी किती टक्के स्त्रिया मुक्तपणे लिहू शकतात, असे प्रश्न व्यवस्थेला विचारात लेखनात मुक्तसंचार आवश्यक असल्याची भावना व्यक्त केली. योगिनी सातारकर यांनी विविध बंडखोर कवयित्रींचे दाखले देत मराठी लेखिका-कवयित्रींचे लेखन स्त्रीवादाच्या अडगळती पडले नसल्याचे स्पष्ट केले. तसचे स्त्री ही माणूस व व्यक्ती म्हणून व्यक्त होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

Web Title: Women’s writing is associated with character

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.