भिशीच्या पैशावरून महिलेची आत्महत्या

By Admin | Updated: July 4, 2014 00:19 IST2014-07-03T23:56:53+5:302014-07-04T00:19:56+5:30

लोहा : भिशीच्या व्यवहारात गुंतविलेले सात लाख रुपये मागण्यासाठी गेलेल्या एका ४२ वर्षीय महिलेला उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने महिलेने मंगळवारी विषारी औषध प्राशन केले़

Women's Suicide on Bhisi's Money | भिशीच्या पैशावरून महिलेची आत्महत्या

भिशीच्या पैशावरून महिलेची आत्महत्या

लोहा : भिशीच्या व्यवहारात गुंतविलेले सात लाख रुपये मागण्यासाठी गेलेल्या एका ४२ वर्षीय महिलेला उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने महिलेने मंगळवारी विषारी औषध प्राशन केले़ दोन दिवसाच्या उपचारानंतर त्या महिलेचा ३ रोजी मृत्यू झाला़
मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी प्रेतासह मयत महिलेच्या संतप्त नातेवाईकांनी लोहा पोलिस ठाण्यात ठिय्या दिला़ कंधारचे उपविभागीय पोलिस अधिकारी व पोलिस निरीक्षकांच्या आश्वासनानंतर मयतावर अंत्यसंस्कार करण्यात आले़ शहरातील देऊळगल्ली भागात राहणाऱ्या छाया दिलीप बोटवे या अंगणवाडी कार्यकर्ती असलेल्या महिलेने बचत गटाच्या माध्यमातून बाजारात लाखो रुपयांची उलाढाल सुरू केली व बीसीच्या माध्यमातून लाखो रुपये गोळा करून नंतर फायनान्स सुरू केले़ सदरील व्यवसाय हा लोहा शहरासह गंगाखेड, माळाकोळीसह ग्रामीण भागापर्यंत सुरू होता़ भरलेला पैसा परत मिळावा म्हणून अनेक महिला-पुरूषांचे खेटे बोटवे यांच्या घरी सुरू होते़ त्यातच ललिता पिराजी वानखेडे (वय ४२, रा़ लोहा) या महिलेने छाया बोटवे यांच्याकडे जमा केलेली सात लाख रुपयांची रक्कम मागण्यास सुरुवात केली़ मात्र बोटवे यांनी उडवाउडवीची उत्तरे देत चालढकल करीत असल्यामुळे त्रस्त झालेल्या ललिता वानखेडे यांनी मंगळवारी १ जुलै रोजी विषारी औषध प्राशन केले़ त्यांना तत्काळ लोह्याच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले़ मात्र प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नांदेडला पाठविण्यात आले़ ३ जुलै रोजी सकाळी उपचारादरम्यान ललिताबाई वानखेडे यांचा मृत्यू झाला़
मयत महिलेच्या संतप्त नातेवाईकांनी आरोपीविरूद्ध तत्काळ गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी प्रेत असलेल्या रुग्णवाहिकेसह लोहा पोलिस ठाण्यात बराच वेळ ठिय्या दिला़ घटनेचे गांभीर्य पाहता कंधारचे उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक विरकर यांनी लोहा पोलिस ठाण्यात येवून मयत महिलेच्या नातेवाईकाशी चर्चा केली़ संबंधित आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर प्रेतावर अंत्यसंस्कार करण्यात आले़ या प्रकरणी पोलिस निरीक्षक अनिलसिंह गौतम यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती़ (वार्ताहर)

Web Title: Women's Suicide on Bhisi's Money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.