दारुबंदीसाठी महिलांचे आंदोलन

By Admin | Updated: April 18, 2017 23:54 IST2017-04-18T23:52:23+5:302017-04-18T23:54:36+5:30

तळणी :महिलांनी देशी दारुच्या दुकानाला कुलूप ठोकून लोणार - मंठा रस्त्यावर तळणी चौकात मंगळवारी रास्ता रोको आंदोलन केले.

Women's movement for alcohol prohibition | दारुबंदीसाठी महिलांचे आंदोलन

दारुबंदीसाठी महिलांचे आंदोलन

तळणी : मंठा तालुक्यातील तळणी गावातील वडार गल्लीतील देशी दारूचे दुकान गावापासून दोन कि.मी अंतरावर हलविण्यात यावे अन्यथा बंद करावे या प्रमुख मागणीसाठी महिलांनी देशी दारुच्या दुकानाला कुलूप ठोकून लोणार - मंठा रस्त्यावर तळणी चौकात मंगळवारी रास्ता रोको आंदोलन केले. अडीच तास सुरू असलेल्या आंदोलनामुळे दोन्ही बाजूंनी वाहतूक ठप्प झाली होती. विषेश म्हणजे तहसील प्रशासनाचे कर्मचारी दोन तास उशिराने घटनास्थळी पोहचले.
सन २००९ पासून सावित्रीबाई फुले बहुउद्देशीय महिला मंडळातील महिलांनी वेळोवेळी गावातील वडार गल्लीतील देशी दारूचे दुकान बंद करावे अन्यथा १८ एप्रिलपर्यंत इतरत्र हलवावे, या मागणीचे महिला मंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना १ एप्रिल रोजी दिले होते.
परंतु याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने महिलावर्गात संताप होता. दारूमुळे संसार उद्ध्वस्त होत आहेत. जिल्हा प्रशासन याकडे कानाडोळा करते यामुळे महिलांनी रोष व्यक्त केला. पोलिसांसह प्रशासन काही करीत नसल्याने अखेर महिला मंडळाच्या पदाधिकारी महिलांसह गावातील महिलांनी १७ एप्रिलपर्यंत गावातील देशी दारूचे दुकान इतरत्र हलविण्याची पुन्हा निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले. दुकान हलविले नाही तर तीव्र आंदोलन करून स्व:त महिला दुकान बंद करून टाळे लावणारे असल्याचे निवेदन सोमवारी दिले होते. मात्र निवेदन देऊनही दुकान बंद करण्यात आले नसल्याने अखेर महिलांनी प्रशासनाचा निषेध करत मंगळवारी सकाळी १०.३० वा. विठ्ठल रूक्मिणी मंदिरापासून रॅली काढून ११ वाजता वडार गल्लीतील देशी दारुच्या दुकानाला कुलूप ठोकून ११. ३० ते २ वाजेपर्यंत लोणार - मंठा रस्त्यावर तळणी चौकात भर उन्हात रास्ता रोको आंदोलन केले. अडीच तास रास्तारोको आंदोलनामुळे दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प झाली होती.
मंठा तहसीलचे नायब तहसीलदार सूर्यकांत ताडेवाड यांनी उपोषणस्थळी भेट देऊन सावित्रीबाई फुले बहुउद्देशीय महिला मंडळाच्या अध्यक्षा पार्वती मुदळकर, सचिव निर्मला माने, काँग्रेस महिला अध्यक्षा अर्चना राऊत, महादेव माने, जनार्दन आढळकर, गणेश गुजर, अमोल सरकटे, अंकुश खरात यांच्याशी चर्चा केली. आंदोलनकर्त्यांच्या मागण्या संबंधितांकडे पाठवू असे लेखी आश्वासन दिल्यावर संतप्त महिलांनी आंदोलन मागे घेतले.

Web Title: Women's movement for alcohol prohibition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.