नरबळी प्रकरणात महिला जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2017 01:06 IST2017-04-14T01:05:00+5:302017-04-14T01:06:55+5:30
कळंब : तालुक्यातील पिंपळगाव (डो़) येथील बालकाच्या नरबळी प्रकरणात पोलिसांनी पुणे येथील एका महिलेला जेरबंद केले आहे़

नरबळी प्रकरणात महिला जेरबंद
कळंब : तालुक्यातील पिंपळगाव (डो़) येथील बालकाच्या नरबळी प्रकरणात पोलिसांनी पुणे येथील एका महिलेला जेरबंद केले आहे़ रविवारी, सोमवारी अटक केलेल्या दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना १८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळगाव (डो़) येथील सहा वर्षीय बालक कृष्णा इंगोले याच्या हत्येचे गूढ पोलिसांना उलगडले आहे़ चिमुकल्या कृष्णाचा खून हा नरबळीचा प्रकार असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे़ या प्रकरणात पोलिसांनी प्रारंभी उत्तम इंगोले, उर्मिला इंगोले (रा़पिंपळगाव डो़ह़मु़पुणे) व मांत्रिक लखन उर्फ राहूल चुडावकर (रा़पुणे) याला ताब्यात घेतले होते़ त्यांची चौकशी करून त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली होती़ त्यानंतर जवळपास दीड महिन्याच्या कालावधीत या प्रकरणातील धागेदोरे हाती लागल्यानंतर पोलिसांनी ९ एप्रिल रोजी द्रोपदी उर्फ लक्ष्मी पौळ या महिलेस तर साहेबराव इंगोले या इसमाला १० एप्रिल रोजी अटक केली होती़ या दोघांची गुरूवारी पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते़ त्यांना १८ एप्रिल पर्यंत वाढीव पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़ पोलिसांनी गुरूवारी सुवर्णा दीपक मडाळे (रा़ पर्वती वसाहत, पुणे) या महिलेला जेरबंद केले आहे़ आजवर या प्रकरणात पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे़ या प्रकरणाचा अणखी तपास सुरू असून, इतर काही धागेदोरे, आरोपितांचा यात समावेश आहे का ? याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले़