मूलभूत सुविधांसाठी महिलांचे उपोषण
By Admin | Updated: June 13, 2014 00:33 IST2014-06-13T00:02:11+5:302014-06-13T00:33:47+5:30
निलंगा : निलंगा पालिका प्रशासन कुचकामी ठरत असल्याचा असंतोष व्यक्त करत येथील महिलांनी गुरुवारी तहसील कार्यालयासमोर उपोषण केले़

मूलभूत सुविधांसाठी महिलांचे उपोषण
निलंगा : नागरिकांना मुलभूत सुविधा पुरविण्यास निलंगा पालिका प्रशासन कुचकामी ठरत असल्याचा असंतोष व्यक्त करत येथील महिलांनी गुरुवारी वटसावित्री पौर्णिमेचे औचित्य साधून त्यांच्या विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले़
गेल्या बारा दिवसापासून शहराला पालिकेतर्फे होणारा पाणीपुरवठा खंडित झाला आहे़ पालिका प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे महिलांना घागरी घेऊन पाण्यासाठी वनवन फिरावे लागत आहे़ गुरुवारी वटपौर्णिमा असल्याने नगराध्यक्षा महिला असूनही त्यांना महिलांची किव आली नाही़ परिणामी याबाबत पालिका प्रशासन गप्पच आहे़ गल्ली बोळात कचऱ्याचे ढिगारे, तुंबलेल्या गटारीमुळे गल्ली, घरात दुर्गंधी पसरते़ डासांचे प्रमाण वाढले़ त्यामुळे साथीच्या रोगांनाही सामोरे जावे लागत आहे़ लाईटचे पोल असून, त्यावरील दिवे बंद आहेत़ शिवाजी नगर भागातील हाडगा रोडवरील बोेअर दुरुस्त करावा, विकासकामाच्या नावावर निकृष्ट दर्जाची कामे, रोडची गटारीची कामे होत आहेत़ या कामाचा दर्जा सुधारावा, आदी मागण्यांसाठी गुरुवारी वटपौर्णिमेचे औचित्य साधून पालिका प्रशासनाविरूद्ध घोषणाबाजी करत निलंगा तहसील कार्यालयासमोर महिलांनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले़
यावेळी इरमाबाई काशीनाथ डांगे, बेबी एकनाथ पोतदार, यमलाबाई दिगंबर चुरमुरे, अनिता भास्कर कळसे, मुन्नाबी राजू मोमीन, शबाना इक्बाल शेख, खुर्शिदबी बाबूमियाँ शेख, बिपाशा शेख, वृंदावनी विजय नितवरे, शारदाबाई राम घोलप, राणी संजय कस्तुरे, लता श्रीरंग दगडे पाटील आदी महिलांनी एक दिवसाचे उपोषण करून त्यांच्या विविध मागण्यांसाठी निलंग्याचे तहसीलदार एऩडी़टिळेकर यांना निवेदन देण्यात आले़ (वार्ताहर)