महिला आघाडीला तिकिटे मिळायला हवी होती
By Admin | Updated: April 14, 2015 01:06 IST2015-04-14T01:01:58+5:302015-04-14T01:06:58+5:30
औरंगाबाद : शिवसेनेतील महिला आघाडीला उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी आक्रमक होऊन आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. महिला आघाडीच्या सदस्यांना उमेदवारी मिळणे गरजेचे होते

महिला आघाडीला तिकिटे मिळायला हवी होती
औरंगाबाद : शिवसेनेतील महिला आघाडीला उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी आक्रमक होऊन आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. महिला आघाडीच्या सदस्यांना उमेदवारी मिळणे गरजेचे होते, असे मत शिवसेनेच्या आ.नीलम गोऱ्हे यांनी आज येथे व्यक्त केले. मनपा निवडणुकीच्या प्रचारासाठी त्या आल्या होत्या.
युती, बंडखोरी, महिला आघाडी आणि आरक्षणामुळे महिलांना मिळालेल्या उमेदवाऱ्या व निवडून आल्यानंतर त्यांच्या कामकाजाची पद्धत यावर त्यांनी आपले मत व्यक्त केले. महिला आघाडीचा सन्मान ठेवावा, असे पक्षप्रमुख वारंवार सांगतात. यापूर्वीही महिला आघाडीला उमेदवारी दिली; पण साम, दाम, दंड, भेद या नीतीमुळे त्यांचा पराभव झाल्याचा अनुभव आहे. काही ठिकाणी महिला कमी पडतात. परंतु ज्यांना उमेदवारी मिळाली नाही, त्यांचा सन्मान केला जाईल.
युती झाली असली तरी बंडखोरी झाली आहे, यावर त्या म्हणाल्या कार्यकर्त्यांच्या भावना असतात, त्याचा आदर करायचा असतो. परंतु जे सोबत राहतील ते मावळे, उडतील ते कावळे. युती व्हावी, ही जनतेची इच्छा आहे. स्थानिक नेत्यांच्या कुटुंबात उमेदवाऱ्या गेल्या, याप्रकरणी त्या म्हणाल्या, निवडून येण्याच्या क्षमतेवर उमेदवारी दिली जाते. शिवसेनेत बहुतांश तिकिटे सर्वसामान्यांना मिळतात. घराणेशाहीचा अपवाद असतो. मग युवा सेनेच्या कार्यकर्त्यांचा विचार केव्हा होणार असे त्या म्हणाल्या. उमेदवारांची यादी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पाहतात. स्थानिकांवर विश्वास ठेवूनच ते निर्णय घेतात. विश्वासाला तडा गेला तर त्यांच्याकडे माफी नाही.
एमआयएमला शिवसेनेचे पाठबळ असल्याचा आरोप होत आहे, यावर त्या म्हणाल्या, सेनेच्या विरोधात सर्वांची छुपी युती होत आहे. सेना एमआयएमसोबत कशी असेल?