महालकिन्होळा येथे दारूविक्रीविरुद्ध महिलांचा एल्गार
By Admin | Updated: July 4, 2017 00:06 IST2017-07-04T00:00:49+5:302017-07-04T00:06:06+5:30
वडोदबाजार : घरातीलच सदस्य असलेल्या तळीरामाकडून होणारा सततचा त्रास असह्य झाल्याने गावातील महिलांनी एकत्र येऊन दारूमुक्त गाव करण्यासाठी थेट अवैध दारू विक्रेत्यांच्याच घरातून दारूच्या बाटल्या फोडल्या.

महालकिन्होळा येथे दारूविक्रीविरुद्ध महिलांचा एल्गार
लोकमत न्यूज नेटवर्क
वडोदबाजार : घरातीलच सदस्य असलेल्या तळीरामाकडून होणारा सततचा त्रास असह्य झाल्याने गावातील महिलांनी एकत्र येऊन दारूमुक्त गाव करण्यासाठी थेट अवैध दारू विक्रेत्यांच्याच घरातून दारूच्या बाटल्या बाहेर काढून रस्त्यावर फोडल्या. सोमवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास महालकिन्होळा (फर्शी) येथील महिलांनी अवैधरीत्या दारू विक्रेत्यांविरुद्ध ग्रामसभा घेऊन आवाज उठविला. विशेष म्हणजे ग्रामस्थांनी पोलीस चौकीसाठी दिलेल्या जागेवरच दारू विक्री होत आहे. याकडे राज्य उत्पादन शुल्क विभाग, स्थानिक गुन्हे शाखा व वडोदबाजार पोलिसांचे दुर्लक्ष आहे.
औरंगाबाद-जळगाव मार्गावरील फर्शी फाटा येथे रस्त्यावरच घरे असलेल्या तीन कुटुंबांकडून अनेक वर्षांपासून देशी दारूची अवैधरीत्या विक्री केली जाते. न्यायालयाने राज्य मार्गावरील बीअर बार बंद केल्यापासून विदेशी दारू विक्रीसुद्धा सुरू आहे. सदरच्या दारू विक्रेत्यांविरुद्ध पोलिसात यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत. मात्र कारवाईनंतर सुटून घरी परतताच ते दारू विक्री करतात. महामार्गावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या अनेक वाहनचालकांना सदर ठिकाणी सहज दारू मिळत असल्याने गावातील व रस्त्याने ये- जा करणाऱ्यांना २४ तास येथे दारू मिळत असते. त्यामुळे तळीराम झिंगलेल्या अवस्थेत पडलेले असतात. दारूच्या व्यसनामुळे अनेकांच्या घरात कौटुंबिक कलह निर्माण झाल्याने गत १५ दिवसांपासून गावातील महिलांच्या मनात अवैध दारू विक्रीविरुद्ध खदखदीने अखेर सोमवारी रौद्र रूप धारण केले.
यानंतर अवैध दारूसह परवानाधारक विदेशी दारूचे दुकानही कायमचे बंद करण्यात यावे, असा ठराव सोमवारी महिलांच्या विशेष ग्रामसभेत पारित झाला. ग्रामसभा झाल्यावर महिलांनी थेट राज्य मार्गावरील अवैध दारू विक्री करणाऱ्यांच्या घरात घुसून देशी दारूचे बॉक्स बाहेर काढून शेकडो बाटल्या रस्त्यावर फोडल्या. एका घरातून तर देशी दारूसह विदेशी दारूच्या बाटल्या महिलांना मिळून आल्या.
आज महिलांची आक्रमकता पाहून अनेक तरुण मुले, पुरुषही त्यांच्यासोबत सहभागी झाले होते. दारूच्या काही बाटल्या पोलीस ठाण्यात जमा करण्यात आल्या. त्यामुळे परिसरातील इतर गावांतील अवैधरीत्या दारू विकणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.
कुठल्याही परिस्थितीत गाव दारूमुक्त करायचे आहे, अशी संकल्पना महिलांनी मनाशी बांधून वेळ पडल्यास मतदान घेण्याची तयारी दर्शविली आहे. महिलांनी वडोदबाजार ठाण्यात धाव घेऊन कारवाई करण्यासंदर्भात पोलिसांना सरपंच वंदना पंडित पारखे व ग्रामसेवक आर. एस. पवार यांची स्वाक्षरी असलेले निवेदन दिले.