महिलांची कुचंबणा
By Admin | Updated: June 27, 2014 00:15 IST2014-06-26T23:38:06+5:302014-06-27T00:15:05+5:30
उमरी : येथील ग्रामीण रुग्णालयात आंतररूगण विभागात महिला डॉक्टर नसल्याने महिला रुग्णांची कुचंबणा होत आहे़

महिलांची कुचंबणा
उमरी : येथील ग्रामीण रुग्णालयात आंतररूगण विभागात महिला डॉक्टर नसल्याने महिला रुग्णांची कुचंबणा होत आहे़
येथील ग्रामीण रुग्णालयात परिसरातील ७० ते ८० खेडे गावातून रुग्ण उपचारासाठी येतात़ उमरी हे नांदेडपासून ४५ ते ५० कि़ मी़ अंतरावर असल्याने सर्वच प्रकारच्या रुग्णांना उमरी गाठावे लागते़ या रुग्णालयात पुरेशा सुविधा व तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने रात्री-अपरात्री रुग्णांना नांदेडला हलविले जाते़ विशेषत: माता-बाल मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी शासन देशपातळीवर कार्यक्रम राबवित आहे़ त्यासाठी करोडोंचा खर्च होतो आहे़ मात्र ग्रामीण भागात तज्ज्ञ डॉक्टर व सुविधांअभावी रुग्णांचे हाल होत आहेत़ उमरीच्या रुग्णालयात सध्या उपलब्ध असलेले महिला डॉक्टर आयुष व एनआरएचएम योजनेअंतर्गत कंत्राटी पद्धतीवर सेवा देतात़ केवळ बाह्यरूग्ण विभागात दुपारपर्यंत रुग्णांची तपासणी करून ते मोकळे होतात़ मात्र नंतरच्या कालावधीत येणाऱ्या महिला रुग्णांना तपासणीसाठी पुरूष डॉक्टरच उपलब्ध असतात़ अशावेळी अनेक महिलांनी पुरूष डॉक्टरांकडून तपासणी करून घेण्यास संकोच व्यक्त करतात़ काहींनी त्यास स्पष्ट विरोधच केल्याच्या घटना झाल्या़ म्हणून ग्रामीण रुग्णालयात पूर्णवेळ स्त्रीरोग तज्ज्ञ महिला डॉक्टर देण्याची मागणी होत आहे़ शासनाने सन २०१० साली लागू केलेल्या वैद्यकीय सेवेच्या दरासंदर्भात अद्याप संभ्रम आहे़ जिल्हा सामान्य रुग्णालयासाठी प्रती रुग्णाला १० रुपये तर ग्रामीण रुग्णालयाला ५ रुपये असे दर असल्याचे सांगण्यात येते़ मात्र उमरीला प्रत्येक रुग्णाला बाह्यरूग्ण विभागात १० रुपयेप्रमाणे वसूल केले जातात़ यासंदर्भात जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालये व जिल्हा सामान्य रुग्णालयात समन्वय असणे आवश्यक आहे़(वार्ताहर)
महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक आरोग्य सेवेसाठी जिल्हास्तर वगळता इतर ठिकाणी बाह्यरूग्ण विभागातील रुग्णांना १० रुपये असा दर सूचित केला़ मात्र आम्ही जिल्हा शल्य चिकित्सकांना पत्राद्वारे स्पष्ट मार्गदर्शन मागविले - डॉ़माधव विभुते, प्रभारी अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, उमरी