- सदाशिव प्रयागबाई खंडाळकरछत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील फुलंब्री मतदारसंघातून अनुराधा चव्हाण, तर कन्नड मतदारसंघातून संजना जाधव यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश संपादन केलं. प्रथमत:च असं घडलंय. जिल्ह्याचा इतिहास तपासला, तर महिला आमदार म्हणून फार कमी महिलांना संधी मिळालीय. अगदी बोटावर मोजता येतील एवढीच नावं घेता येतील. अगदी अलीकडे तेजस्विनी जाधव या कन्नडमधून त्यांचे पती रायभान जाधव यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत विजयी झाल्या होत्या. आता तेजस्विनी जाधव यांचे पुत्र हर्षवर्धन जाधव यांना पराभूत करून संजना जाधव विजयी झाल्या आहेत. पती हर्षवर्धन यांचाच संजना यांनी पराभव केला.
राजस्थानचे राज्यपाल म्हणून हरिभाऊ बागडे गेल्यानंतर त्यांच्या राजकीय वारसदारांची संख्या एकीकडे वाढत असतानाच अनुराधा चव्हाण यांनी बाजी मारली आणि भल्याभल्यांना मागे सारत त्या फुलंब्रीच्या लोकप्रतिनिधी बनल्या. वरिष्ठांशी चांगले संबंध आणि स्वत:ची मजबूत आर्थिक बाजू तसेच हरिभाऊ बागडे यांचे मिळालेले आशीर्वाद या जोरावर अनुराधा चव्हाण यांनी यशश्री खेचून आणली.
महिला आरक्षण २०२९ मध्ये लागू होईल. तोपर्यंत तरी त्यांच्या वाट्याला संघर्ष आहेच. मुळात कोणताही राजकीय पक्ष महिलांना व युवकांना तिकिटे देताना प्राधान्य देऊ, असे जोरजोरात सांगत असतात. परंतु, प्रत्यक्षात त्यांचे वर्तन विपरीत घडत असते. हा नेहमीचा अनुभव आहे. म्हणूनच इतक्या वर्षांत वैजापूरहून एक विनायकराव पाटील यांच्या पत्नी शकुंतला पाटील व आशाताई वाघमारे यांना संधी मिळाली होती. ही फार पूर्वीची गोष्ट आहे.
गंगापूर तालुका हा कम्युनिस्टांचा एकेकाळी बालेकिल्ला होता. त्या काळात प्रख्यात कम्युनिस्ट नेते चंद्रगुप्त चौधरी यांच्या पत्नी कॉ. करुणाभाभी चौधरी निवडून आल्या होत्या. आता हा सारा इतिहासच झाला आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपद आरक्षणामुळे अनेक महिलांना मिळाली, पण विधानसभेतलं प्रतिनिधित्व फारसं नाहीच, असं म्हणावं लागेल. महिला आरक्षण सुरू झाल्यानंतर प्रत्यक्षात काय घडेल हे पाहणंही रंजकच ठरणार आहे!