महिलांना प्राधान्य द्यायलाच पाहिजे
By Admin | Updated: September 20, 2015 01:11 IST2015-09-20T00:55:18+5:302015-09-20T01:11:03+5:30
औरंगाबाद : ‘कोणत्याही मंगलकार्याची तयारी ही महिलाच करतात. तरीसुद्धा त्यांना आपण योग्य तो दर्जा देत नाही. सर्व कार्यांत महिलांना सहभागी करून घेतले, तर सगळी कार्ये संपन्न होतात

महिलांना प्राधान्य द्यायलाच पाहिजे
औरंगाबाद : ‘कोणत्याही मंगलकार्याची तयारी ही महिलाच करतात. तरीसुद्धा त्यांना आपण योग्य तो दर्जा देत नाही. सर्व कार्यांत महिलांना सहभागी करून घेतले, तर सगळी कार्ये संपन्न होतात, असे वाणी नवीनचंद्र रेड्डी यांनी ‘लोकमत’तर्फे सुरू केलेल्या ‘ती’च्या गणपती आरतीच्या वेळी म्हटले.
या मंगलप्रसंगी विशाखा समितीच्या अध्यक्ष अर्चना गोंधळेकर व डॉ. आशा साकोळकर यांची उपस्थिती लाभली होती. त्याबरोबरच ‘ती’च्या गणपतीच्या उद्देशाने प्रभावित होऊन आर.आर. बाहेती शाळेच्या अंध विद्यार्थ्यांनी यावेळी कार्यक्रमाला सदिच्छा भेट दिली.
सर्वार्थाने महिलांच्या सहभागाने आयोजित ‘ती’चा गणपती हा महिलांच्या सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी सुरू करण्यात आला आहे. यावेळी अर्चना गोंधळेकर म्हणाल्या की, ‘पुरुषप्रधान समाजात स्त्रीला स्वत:चे स्थान निर्माण करण्यासाठी लढा द्यावा लागणार आहे. जगाशी जर स्पर्धा करायची असेल तर महिलांना समान वागणूक आणि मान देण्याची गरज आहे.
मूल्य हरवत चाललेल्या समाजाला एक स्त्रीच योग्य दिशा देऊ शकते आणि २०२० मध्ये भारताचे जागतिक महासत्ता बनायचे स्वप्न नारी शक्तीच्या जोरावर पूर्ण होऊ शकते. म्हणून ‘ती’च्या गणपतीमुळे समाजात या दृष्टीने नक्कीच प्रेरणादायी संदेश जाईल.’ डॉ. आशा साकोळकर म्हणाल्या की, ‘प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांना प्राधान्य दिले पाहिजे. महिलांना समाजात दर्जा आणि संधी दिली तर समाजाचा सर्वांगीण विकास होईल. स्त्री ही अष्टपैलू असते. हे रोजच्या वागण्यातून सिद्ध होते. मूल, बाळ आणि नवऱ्याची काळजी घेत घराचा योग्यरीतीने सांभाळ करते. सामाजिक भान बाळगून अशा कार्यक्रमांचे वेळोवेळी आयोजन करण्यात आले पाहिजे.’
आई, बहीण, मैत्रीण, पत्नी अशा विविध रूपांत आपल्या जीवनात आनंद भरणाऱ्या स्त्रीचा सन्मान करणे आपले प्रथम कार्य आहे.
आपल्या महान संस्कृतीमध्ये स्त्रीला सर्वोच्च स्थान आहे. म्हणूनच ‘लोकमत’ने कृती, निर्मिती आणि संस्कृती हे ब्रीदवाक्य मनी ठेवून ‘तीच्या’ गणपतीचा अनोखा उपक्रम सुरू केला.
आपल्या गणेश मंडळात जर ‘ती’चा गणपतीसारखा उपक्रम राबविण्यात येत असेल, तर महिला आरती करीत असलेले छायाचित्र लोकमत इव्हेन्ट विभाग, लोकमत भवन, औरंगाबाद येथे पाठवावे. ‘लोकमत’तर्फे असे छायाचित्र प्रकाशित करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. अधिक महितीसाठी ९८५०४०६०१७ या क्रमांकावर संपर्क साधावा.