दर स्थिर राहावेत हीच महिलांची अपेक्षा...
By Admin | Updated: July 8, 2014 01:04 IST2014-07-08T00:40:38+5:302014-07-08T01:04:59+5:30
औरंगाबाद : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारकडून नागरिकांना बऱ्याच अपेक्षा आहेत.

दर स्थिर राहावेत हीच महिलांची अपेक्षा...
औरंगाबाद : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारकडून नागरिकांना बऱ्याच अपेक्षा आहेत. दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे भडकलेले दर कमी होत नाहीत की, स्थिरही राहत नाहीत, त्यामुळे मर्यादित उत्पन्न असलेल्यांचे जगणेच कठीण झाले आहे. धान्य, भाजीपाला, पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर वाढल्यामुळे कुटुंबाचे मासिक बजेट बिघडले आहे, अशा प्रतिक्रिया गृहिणींनी व्यक्त केल्या. भाजी घेतानाही विचार केला जात आहे. ५० रुपयांत एक वेळची भाजी होत असल्याचे या गृहिणींनी सांगितले.
सर्वसामान्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार केला जावा. वेतनात वाढ झाल्यास महागाईला तोंड देता येईल. महिलांचे आरोग्य आणि शिक्षण यांना प्राधान्य देण्यात यावे. महागाई कमी करण्यासाठी कठोर पावले उचलावीत, अशा त्यांच्या अपेक्षा आहेत.
केंद्र सरकारचा केंद्रीय अर्थसंकल्प ९ जुलै रोजी सादर होणार आहे. मोदी सरकार कोणत्या घोषणा करणार याची उत्सुकता सगळ्यांना आहे. महिलांचेही लक्ष त्याकडे लागले आहे. कारण महागाई वाढली की, खर्चाची तोंडमिळवणी त्यांनाच करावी लागते.
गरिबांची कोंडी
अर्थसंकल्पात जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढले की, गरिबांसाठी एक वेळचे जेवणही खूप खर्चिक होते. त्यामुळे सरकारने या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांची परिस्थिती विचारात घ्यावी. - रूपाली करपे
महिलांचा विचार व्हावा
केंद्रीय अर्थसंकल्पात महिलांच्या अडचणींचा विचार केला जावा. महिलांना तुटपुंजा पैशांत घर चालवणे कठीण होते. त्यामुळे महिलांची मानसिक स्थिती बिघडण्याची शक्यता असते. म्हणून अर्थसंकल्पात जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढवू नयेत. - सुधा मुसांडे
आम्ही खायचे काय?
गॅस, पेट्रोल, भाज्या, धान्याचे भाव आकाशाला पोहोचले असल्यामुळे आम्ही काय खायचे, असा प्रश्न आहे. भाव वाढल्यामुळे प्रत्येक वस्तू घरी आणण्याचे प्रमाणही घटले आहे. - विजयमाला गनकवार
नियोजन बिघडले
महागाई थांबत नसल्यामुळे महिन्याचे नियोजन करण्यात अडचणी येतात. एका महिन्यासाठी केलेले आर्थिक नियोजन वाढत्या महागाईमुळे बिघडले आहे.
- जयश्री तिवारी
शिक्षणावरील खर्च कमी झाला
वाढत्या महागाईमुळे मुलांच्या शिक्षणासाठी आवश्यक असलेला खर्चही करता येत नाही. शैक्षणिक बाबींवरील खर्चही भरमसाठ वाढत आहेत. या सगळ्यांची सांगड घालणे अवघड झाले आहे. - मनीषा तांगडे