पालिकेत महिला कारभारणी !

By Admin | Updated: January 1, 2015 00:25 IST2015-01-01T00:24:26+5:302015-01-01T00:25:54+5:30

उस्मानाबाद : नगर परिषद सभापतींच्या निवडी बुधवारी पार पडल्या. यावेळी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पाचही समित्यांवर महिलांना काम करण्याची संधी देण्यात आली आहे.

Women in the corporation! | पालिकेत महिला कारभारणी !

पालिकेत महिला कारभारणी !


उस्मानाबाद : नगर परिषद सभापतींच्या निवडी बुधवारी पार पडल्या. यावेळी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पाचही समित्यांवर महिलांना काम करण्याची संधी देण्यात आली आहे. त्यामुळे पालिकेमध्ये ‘महिलाराज’ आवतरले आहे.
उस्मानाबाद नगर परिषदेची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे. राष्ट्रवादीचे सर्वाधिक बावीस सदस्य असून काँग्रेस पक्षाचे पाच, सेनेचे चार तर अपक्ष आणि भाजपा यांचे प्रत्येकी एक असे संख्याबळ आहे. कार्यकाळ संपल्यामुळे मागील काही महिन्यांपूर्वीच अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या निवडी करण्यात आल्या होत्या. अध्यक्षपदी सुनील काकडे तर उपध्यक्षपदी खलिफा कुरेशी यांची वर्णी लागली होती. दरम्यान, विषय समिती सभापतींचाही कार्यकाळ संपल्यामुळे त्यांच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार बुधवारी पालिकेच्या सभागृहामध्ये नतून सदस्य निवडीसाठी बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी अध्यक्ष सुनील काकडे, उपाध्यक्ष खलिफा कुरेशी यांच्यासह पालिकेचे मुख्याधिकारी शशीमोहन नंदा यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संख्याबळ अधिक असल्याने पाचही समित्यांवर राष्ट्रवादीच्याच सदस्यांची वर्णी लागली आहे. महत्वाचे खाते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बांधकाम समितीवर माधवी निंबाळकर यांची वर्णी लागली आहे. तसेच पाणीपुरवठा समिती सभापती म्हणून काम करण्याची संधी उषा परदेशी यांना मिळाली आहे. त्याचप्रमाणे महिला व बालकल्याण सभापती म्हणून मिनियार फौजिया बेगम मैनुद्दीन यांची निवड झाली आहे. तसेच शिक्षण सभापतीपदी भागिरीथी लोकरे यांना काम करण्याची संधी देण्यात आली आहे. एकूणच पाचही समित्यांवर महिला सदस्यांची वर्णी लागली असून आता पालिकेत महिलाराज आले आहे.
‘स्टॅडिंग’वर डोके, इंगळे, चौरे
नगर परिषदेची महत्वाची समिती म्हणून स्थायी समितीकडे पाहिले जाते. या समितीवर तीन सदस्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये संपत डोके, माजी सभापती अभय इंगळे आणि सुवर्णा चौरे यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)
समित्यांवर काँग्रेस, राष्ट्रवादीचे वर्चस्व
कळंब : नगर परिषदेत तहसीलदार वैशाली पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत विषय समिती सभापतींच्या निवडी झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात एक तर इतर सर्व समित्यांवर काँग्रेसच्या नगरसेवकांची वर्णी लागली आहे. असे असतानाच शिवसेनेच्या दोन सदस्यांना एकाही समितीवर काम करण्याची संधी मिळू शकली नाही. यावेळी महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी राष्ट्रवादीच्या काशिबाई खंडागळे, पाणीपुरवठा सभापती म्हणून अतुल कवडे, बांधकाम सभापतीपदी अजित करंजकर, शिक्षण सभापतीपदी मुस्ताक कुरेशी यांची निवड झाली.
भूम : नगर परिषदेत विषय समिती सभापतींच्या निवडी पीठासीन अधिकारी तथा तहसीलदार अरविंद बोळंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडल्या. स्थायी समिती सभापतीपदी नगराध्यक्षा संयोगिता गाढवे यांची निवड झाली. तसेच बांधाकाम सभापती म्हणून कुरेशी तोफिक सत्तार, महिला व बालकल्याण सभापतीपदी सुमन महादेव मांजरे, उपसभापतीपदी रेष्मा सुनील माळी, पाणीपुरवठा सभापतीपदी उपगनाध्यक्ष अ‍ॅड. सचिन मोटे तर शिक्षण सभापतीपदी मिरा सुनील आकरे यांची निवड झाली आहे. नगर परिषद सभागृहामध्ये सकाळी ही विशेष सभा झाली. यावेळी गटनेते संजय गाढवे यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. निवडप्रक्रियेसाठी मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर, कर्मचारी आर. व्ही. आहेरकर, जि. के. जगदाळे, टी.के. माळी, के. डी. फुसके, पी. टी. जाधव यांचे सहकार्य लाभले.
परंडा : पालिकेतील स्थायी समितीसोबतच अन्य विषय समिती सभापतींच्या बिनविरोध निवडी झाल्या. पालिकेच्या सभागृहामध्ये सकाळी ११ वाजता विशेष झाली. यावेळी स्थायी समितीचे पदसिद्ध सभापती म्हणून नगराध्यक्षा जयश्री कंदले तर वाचनालय समिती सभापतीपदी उपाध्यक्ष सुभाषसिंह सद्दिवाल यांची निवड झाली. तसेच महिला व बालकल्याण सभापतीपदी लता मेहेर, बांधकाम सभापतीपदी ईस्माईल कुरेशी, पाणीपुरवठा सभापतीपदी मुकुल देशमुख यांची वर्णी लागली आहे. विशेष सभेस पंधरा सदस्य उपस्थित होते. पिठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार स्वरूप कंकाळ यांनी काम पाहिले. दरम्यान, या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य गैरहजर राहिले. निवडप्रक्रियेसाठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
येणेगूर : उमरगा तालुक्यातील मुरूम नगर परिषदेची विशेष सभा पिठासीन अधिकारी तथा लोहाऱ्याच्या तहसीलदार ज्योती चव्हाण यांच्या उपस्थिती पार पडली. यावेळी स्थायी समिती सभापतीपदी नगराध्यक्षपदी धनराज मंगरूळे यांची निवड करण्यात आली. तसेच पाणीपुरवठा सभापतीपदी शरणप्पा गायकवाड, बांधकाम सभापतीपदी मीरा सोमवंशी, आरोग्य सभापतीपदी सुमन देडे, नियोजन समिती सभापतीपदी व्यंकट जाधव यांची निवड करण्यात आली आहे. स्थायी समितीवर या सभापतींची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. विशेष सभेला महारूद्र चवळे, श्रद्धा पांचाळ, लेखापाल लक्ष्मण कुंभार यांनी काम पाहिले.

Web Title: Women in the corporation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.