महिला पोलिसाला रंगेहाथ पकडले

By Admin | Updated: June 28, 2014 01:15 IST2014-06-28T00:19:39+5:302014-06-28T01:15:35+5:30

बीड : चारित्र्य प्रमाणपत्रासाठी ६०० रुपयांची लाच घेताना एका महिला पोलीस कर्मचाऱ्यास रंगेहाथ पकडले.

The women caught policemen | महिला पोलिसाला रंगेहाथ पकडले

महिला पोलिसाला रंगेहाथ पकडले

बीड : चारित्र्य प्रमाणपत्रासाठी ६०० रुपयांची लाच घेताना एका महिला पोलीस कर्मचाऱ्यास रंगेहाथ पकडले. येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी रात्री पावणे आठ वाजता ही कारवाई केली. या कारवाईने पोलीस दल हादरून गेले आहे.
बबिता भालेराव असे लाच घेताना पकडलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे. मागील दोन वर्षांपासून भालेराव या पोलीस अधीक्षक कार्यालयात जात पडताळणी विभागात कार्यरत आहेत. बीड येथील पांगरी रोडवरील काशीनाथनगर भागात राहणारा शुभम् नवनाथ नाईकवाडे याला चारित्र्य प्रमाणपत्र हवे होते. त्यासाठी त्याने स्वत:चे व बहिणीचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी रीतसर अर्ज केला. गुरुवारी तो अर्ज दाखल करण्यासाठी गेला तेव्हा बबिता भालेराव यांनी त्याला ६०० रुपये मागितले. दरम्यानच्या काळात शुभम् नाईकवाडे तडक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे गेला. उपअधीक्षक हरिष खेडकर यांनी त्याची तक्रार नोंदवून सापळा लावला. रात्री पावणे आठ वाजता बबिता भालेराव जात पडताळणी कार्यालयात बसलेल्या होत्या. शुभम् नाईकवाडे याने ६०० रुपये काढून त्यांच्या हातावर टेकविले. इतक्यात एसीबीच्या महिला कर्मचाऱ्यांनी भालेराव यांना झडप मारून पकडले.
त्यानंतर त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागात आणण्यात आले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत शहर ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई उपअधीक्षक हरिष खेडकर, निरीक्षक विनय बहीर, भाऊसाहेब गोंदकर, पो.हे.कॉ. श्रीराम खटावकर, अशोक ठोकळ, राकेश ठाकूर, योगेश नाईकनवरे, सुशांत सुतळे, कल्याण राठोड, बापू बनसोडे यांनी केली.
आतापर्यंत ३९ जण सापळ्यात
एसीबीचे उपअधीक्षक हरिष खेडकर यांनी १० जून २०१३ रोजी पदभार घेतला. त्यानंतर त्यांनी लाच मागणाऱ्या ३८ अधिकारी, कर्मचाऱ्यांना दणका दिला. बबिता भालेराव यांच्यावरील कारवाईने हा आकडा ३९ वर पोहंचला आहे. ११ बड्या माशांनाही त्यांनी अद्दल घडविली आहे. (प्रतिनिधी)
पोलीस अधीक्षक कार्यालयातच कारवाई
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी बबिता भालेराव यांना पोलीस अधीक्षक कार्यालयातील जात पडताळणी विभागात लाच घेताना रंगेहाथ पकडले. पोलीस अधीक्षक कार्यालयातच एखाद्या कर्मचाऱ्याला लाच घेताना पकडल्याची ही येथील पहिलीच घटना मानली जात आहे. या कारवाईने पोलीस प्रशासनात एकच खळबळ उडाली, विशेष म्हणजे ही कारवाई होत असताना अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी हे देखील आपल्या दालनातच होते.
चार तासांत सापळा
शुभम् नाईकवाडे व त्याच्या बहिणीला कंडक्टर पदासाठी अर्ज करावयाचा आहे. बॅच, बिल्ला काढण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात अर्ज केल्यावर चारित्र्य प्रमाण पत्राची मागणी झाली. त्यानंतर शुभम् प्रमाणपत्र काढण्यासाठी आला. दुपारी ४ वाजता त्याने अर्ज दाखल केला. तेंव्हाच भालेराव यांनी लाच मागितली. त्यानंतर तो एसीबीकडे गेला आणि अवघ्या चार तासात सापळा लावला. शुभम्ला कार्यालयात पाठवून कर्मचारी बाहेर थांबले पैसे घेताच भालेराव यांना पकडले.

Web Title: The women caught policemen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.