घरात घुसून महिलेचा गळा चिरला
By Admin | Updated: September 13, 2014 00:35 IST2014-09-13T00:31:47+5:302014-09-13T00:35:45+5:30
औरंगाबाद : चिकलठाणा परिसरातील चौधरी कॉलनीत एका तरुणाने घरात घुसून महिलेचा चाकूने गळा चिरला.

घरात घुसून महिलेचा गळा चिरला
औरंगाबाद : चिकलठाणा परिसरातील चौधरी कॉलनीत एका तरुणाने घरात घुसून महिलेचा चाकूने गळा चिरला. ही खळबळजनक घटना गुरुवारी सकाळी घडली.
स्वाती राजू नवपुते (२५, रा. चौधरी कॉलनी) असे हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. ती खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे. या हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
घटनेबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, गुरुवारी सकाळी स्वाती नवपुते या घराच्या छतावर धुणे धूत होत्या. घरची मंडळी खाली बसलेली होती. सात वाजेच्या सुमारास बाजूच्या छतावरून एक तरुण नवपुते यांच्या छतावर उडी मारून पोहोचला. अचानक समोर आलेल्या या तरुणाला पाहून नवपुते घाबरल्या. लगेच त्याने हाताने त्यांचे तोंड दाबले आणि खिशातून चाकू काढून तुला आणि तुझ्या नवऱ्याला दोघांनाही संपवून टाकतो, असे म्हणत त्याने चाकूने नवपुते यांच्या गळ्यावर वार केला. लगेच पुन्हा तो छतावरून उडी मारून पसारही झाला. जखमी झालेल्या नवपुते यांनी आरडाओरड केल्यानंतर खाली घरात बसलेली मंडळी धावत छतावर आली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या स्वाती नवपुते यांना तातडीने रुग्णालयात हालविण्यात आले.