महिलेचे दागिने लांबविले
By Admin | Updated: July 8, 2014 00:36 IST2014-07-07T23:45:31+5:302014-07-08T00:36:03+5:30
वसमत : शिर्डीहून निजामबादकडे कारने निघालेल्या दाम्पत्याने रविवारी रात्री वसमतजवळील माळवटा पेट्रोलपंपाशेजारी विश्रांतीसाठी कार उभी केली होती.

महिलेचे दागिने लांबविले
वसमत : शिर्डीहून निजामबादकडे कारने निघालेल्या दाम्पत्याने रविवारी रात्री वसमतजवळील माळवटा पेट्रोलपंपाशेजारी विश्रांतीसाठी कार उभी केली होती. अज्ञात चोरट्यांनी कारमधील महिलेचे दागिने लुटल्याची घटना समोर आली आहे. तक्रार देण्यासाठी हे दाम्पत्य ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखलही झाले होते; मात्र या घटनेची नोंद नसल्याचे ग्रामीण पोलिसांचे म्हणणे आहे.
रविवारी मध्यरात्री वसमत- नांदेड रस्त्यावर एका पाठोपाठ दोन लुुटपाटीच्या घटना घडल्या. यातील जीप चोरल्याच्या प्रकाराची नोंद ग्रामीण पोलिसांत आहे. ही घटना घडल्यानंतर पहाटे तीनच्या सुमारास माळवटा पेट्रोल पंपाजवळ उभ्या कारमधील महिलेच्या अंगावरील दागिने काढून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकाराची मात्र ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद नाही. सदर प्रकाराची समोर आलेली माहिती अशी की, निजामबाद येथील एक दाम्पत्य नव्याकोऱ्या कारने शिर्डीचे दर्शन घेवून परत जात होते. वसमतजवळ ही कार रविवारी मध्यरात्रीनंतर पोहोचली. चालकाला झोप येत असल्याने चालकाने माळवटा पाटीजवळील पेट्रोलपंपाजवळ कार उभी करून विश्रांती घेणे सुरू केले.
पहाटे तीनच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी कारमधील महिलेच्या अंगावरील दागिने काढून घेवून पोबारा केला. लुटल्या गेलेल्या दाम्पत्याने कारसह जिंतूर टी पाँईट गाठले. तेथील कर्मचाऱ्यांच्या मदतीने ग्रामीण पोलिस ठाणे गाठले. ग्रामीण पोलिस ठाण्यात लेखी तक्रारही देण्याचा प्रयत्न या दाम्पत्यांनी केल्याचे वृत्त आहे. जीप चोरी व दागिने लुटल्याची तक्रार देणारे एकापोठापाठ एक ग्रामीण पोलिसांत दाखल झाले, हे विशेष. निजामबाद येथील रहिवासी वैद्यकीय व्यावसायिक हे दाम्पत्य होते. नव्या कारसह ते ग्रामीण पोलिस ठाण्यात आले होते. कार टेपररी पासिंगची होती, असे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे.
या संदर्भात ग्रामीण पोलिस ठाण्याचे सपोनि सुनील नाईक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अशी कोणतीही घटनाच घडली नसल्याचे अगोदर सांगितले. नंतर घटना कानावर आली, मात्र खरी की खोटे हे माहिती नाही, अधिकृत तक्रार आमच्याकडे आलेली नाही. अशीही भूमिका त्यांनी मांडली.
सदर प्रतिनिधीने घटनास्थळी भेट देवून घटनेची सत्यता पडताळून पाहून पुन्हा सपोनि नाईक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या संदर्भात नंतर बोलू, असे सांगून सदर प्रकाराला बगल देण्याचा प्रकार केला. एखाद्या महिलेला लुटण्याची घटना घडली असेल व जर ही महिला तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात आली असेल व या गंभीर प्रकाराची नोंदही पोलिसांनी घेतली नसेल तर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न चिन्हे उभे राहते. ‘पोलिसांत तक्रार नाही’ या एका मुद्यावर जर पोलिस झटकन गंभीर गुन्ह्यावर पांघरून कसे घालू शकतात? हा एक प्रश्नच आहे. (वार्ताहर)
ग्रामस्थांमधून संताप
शिर्डी येथून निजामाबादकडे निघालेल्या दाम्पत्याला रविवारी रात्री माळवटा पाटीनजीक लुटल्याची घटना घडली.
एकाच रात्री लुटमारीच्या दोन घटना घडूनही वसमत ग्रामीण पोलिसांना नाही गांभिर्य.
पोलिस अधिकाऱ्यांची टाळाटाळीची भूमिका.