दरड कोसळल्याने आडगावात महिला ठार

By Admin | Updated: April 7, 2016 01:04 IST2016-04-07T00:58:19+5:302016-04-07T01:04:51+5:30

औरंगाबाद : क्रशरसाठी खदानीतून काढलेले दगड ट्रॅक्टरमध्ये भरताना तब्बल १०० फूट उंचावरून कोसळलेली दरड अंगावर पडल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Woman killed in Padua due to landslides | दरड कोसळल्याने आडगावात महिला ठार

दरड कोसळल्याने आडगावात महिला ठार

औरंगाबाद : क्रशरसाठी खदानीतून काढलेले दगड ट्रॅक्टरमध्ये भरताना तब्बल १०० फूट उंचावरून कोसळलेली दरड अंगावर पडल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना आडगाव चिंचोली (ता. औरंगाबाद) येथे घडली. या घटनेत मृत महिलेचा पती आणि तीनवर्षीय मुलगाही गंभीर जखमी झाला आहे.
भाग्यश्री रमेश देवकर (२५, ह. मु. आडगाव चिंचोली, रा. बिबी, ता. लोणार, जि. बुलडाणा) असे मयत महिलेचे नाव आहे. रमेश पांडुरंग देवकर आणि आरुष रमेश देवकर हे बाप-लेक जखमी आहेत. त्यांच्यावर एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, बुलडाणा जिल्ह्यातील बिबी येथील रमेश देवकर यांची पत्नी भाग्यश्री व तीन वर्षीय मुलगा आरुष हे मागील पंधरा दिवसांपासून आडगाव चिंचोली येथे राहतात. ते येथील खदानीत काम करून पोट भरत आहेत. १५ ते २० मजूर येथे काम करतात. क्रशरसाठी दगड काढण्याचे काम या खदानीत चालते. गुत्तेदार ब्रह्मदेव बोंगाने यांच्यामार्फत हे काम सुरू होते, असे नातेवाईकांनी सांगितले.
सोमवारी दुपारी २ वाजता नेहमीप्रमाणे दगड काढून ते ट्रॅक्टरमध्ये भरण्याचे काम करीत असताना अंदाजे १०० फूट उंचावरून दरड कोसळली. यातील एक दगड भाग्यश्रीच्या अंगावर पडला. यामुळे तिचे डोके फुटले आणि डाव्या हाताला व पायाला गंभीर मार लागला. प्रचंड रक्तस्राव होऊ लागल्यामुळे ती बेशुद्ध पडली. तिला उपचारार्थ औरंगाबादेतील एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना मंगळवारी सायंकाळी ६ वाजता भाग्यश्रीचा मृत्यू झाला. बुधवारी सकाळी सिडको पोलिसांना याची माहिती देण्यात आली. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन घाटी हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदन केले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
दरम्यान, उडालेला दगड रमेश व आरुष यांच्याही डोक्यास लागला होता. त्यांनाही गंभीर जखम झाली आहे. त्यांच्यावर एमजीएममध्ये उपचार करण्यात आले. आरुषच्या डोक्याला टाके पडले आहेत. सिडको ठाण्यात नोंद करून हे प्रकरण चिकलठाणा पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार आहे, असे सिडको पोलिसांनी सांगितले.

Web Title: Woman killed in Padua due to landslides

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.