दुहेरी खुनाच्या गुन्ह्यात महिलेला अटकपूर्व जामीन मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:04 IST2021-07-22T04:04:47+5:302021-07-22T04:04:47+5:30
औरंगाबाद : शेतीच्या वादातून चाकूने वार करून दोघांचा खून केल्याच्या गुन्ह्यात आरोपी सुरेखा पवार हिने सादर केलेला अटकपूर्व जामीन ...

दुहेरी खुनाच्या गुन्ह्यात महिलेला अटकपूर्व जामीन मंजूर
औरंगाबाद : शेतीच्या वादातून चाकूने वार करून दोघांचा खून केल्याच्या गुन्ह्यात आरोपी सुरेखा पवार हिने सादर केलेला अटकपूर्व जामीन अर्ज औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी मंजूर केला. सुरेखाला अटक झाल्यास २५ हजाराच्या जातमुचलक्यावर तिची जामिनावर सुटका करावी, असे आदेशात म्हटले आहे.
यासंदर्भात लताबाई पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा आणि विष्णू मुरचंद पवार यांचा शेतीवरून वाद सुरू होता. १३ एप्रिल रोजी शेतीच्या वादातून दोघांनी एकमेकांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर फिर्यादीचे कुटुंब गावाकडे निघाले असता, रात्री साडेदहा वाजता कारकीन फाट्याजवळ आरोपीने फिर्यादीच्या वाहनाला दुचाकी अडवी लावली. फिर्यादीचा पुतण्या संकेत, फिर्यादीचा भाचा ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरची पत्नी हिराबाई यांच्यावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. उपचारादरम्यान संकेत आणि ज्ञानेश्वर यांचा मृत्यू झाला. त्यावरून विष्णू पवारविरुद्ध एमआयडीसी पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर फिर्यादीने दिलेल्या पुरवणी जबाबानुसार, गुन्ह्यात आरोपी विष्णू पवार याची पत्नी सुरेखा पवार हिचासुद्धा सहभाग असल्याचे नमूद केले.
या गुन्ह्यात सुरेखा पवार हिने अटक टाळण्यासाठी सादर केलेला अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. याविरोधात सुरेखा पवार हिने ॲड. चैतन्य देशपांडे यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात अर्ज दाखल केला. सुनावणीअंती न्यायालयाने वरीलप्रमाणे आदेश दिला. या प्रकरणात ॲड. देशपांडे यांना ॲड. अविनाश बांगर यांनी सहकार्य केले.
---------------------------------------------------------