नायलॉन मांजामुळे गळा चिरल्याने महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:02 IST2021-01-01T04:02:26+5:302021-01-01T04:02:26+5:30
गुरुवारी पतंगाच्या दुकानावर धाडी टाकण्याचे आणि गुन्हे दाखल करण्याचे निर्देश औरंगाबाद : पतंगाच्या दुकानावर ...

नायलॉन मांजामुळे गळा चिरल्याने महिलेचा मृत्यू
गुरुवारी पतंगाच्या दुकानावर धाडी टाकण्याचे आणि गुन्हे दाखल करण्याचे निर्देश
औरंगाबाद : पतंगाच्या दुकानावर गुरुवारी दिवसभर धाडी टाकण्याचे आणि नायलॉन मांजा सापडल्यास संबंधितावर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश न्या. रवींद्र व्ही. घुगे आणि न्या. व्ही.व्ही. कंकणवाडी यांच्या खंडपीठाने गुरुवारी (दि. ३१) पोलीस प्रशासनास दिले.
दिवसभरात किती नायलॉन मांजा जप्त केला याचा अहवाल सादर करा तसेच नायलॉन मांजाने पतंग उडविणाऱ्यांवरसुद्धा कारवाई करण्याचे निर्देश खंडपीठाने दिले आहेत. याप्रकरणात ॲड. सत्यजित बोरा यांची न्यायालयाचे मित्र (अमिकस क्युरी) म्हणून नेमणूक केली आहे. याचिकेवर १ जानेवारीला सुनावणी होणार आहे.
नायलॉन मांजामुळे नाशिकमध्ये महिलेचा गळा चिरल्यामुळे मृत्यू झाल्याच्या बातमीची खंडपीठाने ३० डिसेंबरला स्वतःहून दखल घेतली होती.
राज्य शासनाने नायलॉन मांजावर बंदी घातली आहे. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने जुलै २०१७ पासून देशभरात नायलॉन मांजावर बंदी घातली आहे. नायलॉन मांजामुळे असंख्य पक्षी जखमी होतात, असे पक्षितज्ज्ञ दिलीप भगत यांनी म्हटल्याचा उल्लेख खंडपीठाने केला आहे.
याचिकेत राज्य शासन, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक आणि मनपा प्रशासक यांना प्रतिवादी करण्याचे निर्देश खंडपीठाने दिले आहेत. मुख्य सरकारी वकील डी.आर. काळे आणि सहायक सरकारी वकील यादव लोणीकर प्रतिवाद्यांतर्फे, तर मनपातर्फे ॲड. आनंद भंडारी काम पाहत आहेत.