बांधकाम उपविभाग अधिकाऱ्यांविना
By Admin | Updated: September 5, 2014 00:13 IST2014-09-04T23:53:01+5:302014-09-05T00:13:29+5:30
विठ्ठल भिस, पाथरी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय कार्यालयात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने या विभागांतर्गत सुरू असलेल्या कामाच्या गुणवत्तेबाबत मात्र प्रश्नचिन्ह आहे.

बांधकाम उपविभाग अधिकाऱ्यांविना
विठ्ठल भिस, पाथरी
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पाथरी येथील उपविभागीय कार्यालयात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने या विभागांतर्गत सुरू असलेल्या कामाच्या गुणवत्तेबाबत मात्र प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. विशेष म्हणजे या उपविभागात दोन तालुके असतानाही उपअभियंता हे पद गेल्या तीन वर्षापासून रिक्त असतानाही याकडे मात्र प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनाही लक्ष देण्यास वेळ मिळालेला नाही.
ग्रामीण रस्त्याचा कणा समजल्या जाणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागावर रस्ते विकास अवलंबून असतो. पाथरी येथे पाथरी व मानवत या दोन तालुक्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय कार्यालय आहे. या कार्यालयात मागील तीन वर्षापासून सर्वच कारभार रामभरोसे सुरू आहे. उपविभागीय कार्यालय केवळ नावापुरते आहे की, काय? असा प्रश्न उपस्थित व्हावा, अशी परिस्थिती या कार्यालयाची झाली आहे.
केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनेंतर्गत विकासाची कामे याच उपविभागामार्फत केली जातात. कामाचे मार्कआऊट देण्यापासून कामाचे अंतिमिकरणापर्यंत शाखा अभियंत्यांनी कामावर लक्ष देणे आवश्यक असते. परंतु, सेवकही नाही, रोड कारकूनही नाही, शाखा अभियंता नाही आणि उपअभियंतेही नाहीत, अशी अवस्था झाल्याने कामाच्या गुणवत्तेकडे लक्ष देण्यास एकही कर्मचारी नसल्याने गुत्तेदार आपल्या सोयीप्रमाणे कामे करतात, बिल रेकॉर्ड करतात आणि काम पूर्ण होते, अशीच काही अवस्था झाली आहे.