मुदत संपूनही प्राध्यापक पदावरच
By Admin | Updated: May 12, 2016 00:56 IST2016-05-12T00:12:45+5:302016-05-12T00:56:02+5:30
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर अकॅडेमिक स्टाफ कॉलेजचे संचालक डॉ. एस. ए. खरात यांची मुदत संपून वर्षभराचा कालावधी संपला तरी ते अद्याप पदावरच कार्यरत आहेत.

मुदत संपूनही प्राध्यापक पदावरच
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर अकॅडेमिक स्टाफ कॉलेजचे संचालक डॉ. एस. ए. खरात यांची मुदत संपून वर्षभराचा कालावधी संपला तरी ते अद्याप पदावरच कार्यरत आहेत. कुलगुरूंनी आदेश देऊनही ते पदावरच चिकटून आहेत.
विद्यापीठाचे तत्कालीन कुलसचिव डॉ. धनराज माने यांनी डॉ. खरात यांची २९ मे २०१३ रोजी नियुक्ती केली. खरात हे उस्मानाबाद येथील विद्यापीठाच्या उपकेंद्रात जैवतंत्रज्ञान विभागात कार्यरत आहेत. त्यांची दोन वर्षांसाठी विद्यापीठाच्या अकॅडेमिक स्टाफ कॉलेजवर प्रतिनियुक्तीकरण्यात आली. डॉ. माने हेदेखील उस्मानाबाद जिल्ह्यातील असल्याने त्यांनी खरात यांच्या नियुक्तीला प्राधान्य दिले. नियमानुसार खरात यांची दोन वर्षांची मुदत २८ मे २०१५ रोजीच संपली. त्यांना विद्यापीठाच्या अधिकार मंडळाने मुदतवाढ दिलेली नाही. त्यांची मुदत संपून जवळपास वर्ष होत आले तरीही ते पदावरच चिकटून आहेत.
विद्यापीठाच्या अकॅडेमिक स्टाफ कॉलेजसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने केवळ ८० लाख रुपयांचा निधी दिला आहे. ८० लाख रुपयांचा हा निधी केव्हाच संपून गेला आहे. त्यामुळे याठिकाणी संचालकपदासाठी काही कामच राहिले नाही. तरीही खरात हे संचालक म्हणून कार्यरत आहेत. खरात हे विद्यापीठात थांबल्याने उस्मानाबाद उपकेंद्रातील जैवतंत्रज्ञान विषयाच्या विद्यार्थ्यांचेही नुकसान होत आहे.
विद्यापीठाच्या अकॅडेमिक स्टाफ कॉलेजमध्ये संचालक, उपसंचालक आणि सहायक संचालक, अशा तीन पदांचा भरणा करण्यात आला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे मिळणाऱ्या ८० लाख रुपयांमध्ये या तीन अधिकाऱ्यांच्या वेतनावर वार्षिक सुमारे ४० लाख खर्च होत आहे. संचालक आणि उपसंचालक या दोन पदांचा तर विद्यापीठावर विनाकारण भुर्दंड बसत आहे. यापूर्वी विद्यापीठातीलच डॉ. डी. जी. धुळे, डॉ. वि. ल. धारूरकर, डॉ. एम. डी. शिरसाठ आदींनी संचालकपद भूषवून अकॅडेमिक स्टाफ कॉलेजचा दर्जाही उंचावला आहे. विद्यापीठ प्रशासनाने विद्यापीठ विभागांतूनच संचालकपद नेमावे, असे मत काही प्राध्यापकांनी व्यक्त केले.