दहा दिवसांत १ कोटी १२ लाखांचा माल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2017 00:09 IST2017-06-10T00:07:44+5:302017-06-10T00:09:22+5:30
नांदेड : पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मिना यांच्या विशेष पथकाने गेल्या दहा दिवसांत जिल्ह्यात ११ पोलीस ठाण्याअंतर्गत १४ गुन्हे दाखल करीत १ कोटी १२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे़

दहा दिवसांत १ कोटी १२ लाखांचा माल जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मिना यांच्या विशेष पथकाने गेल्या दहा दिवसांत जिल्ह्यात ११ पोलीस ठाण्याअंतर्गत १४ गुन्हे दाखल करीत १ कोटी १२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे़ यामध्ये अवैध दारुसाठा मोठ्या प्रमाणात आहे़ विशेष पथकाच्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे़
जिल्ह्यातील अवैध धंदे, गुन्हेगारांचा शोध घेणे यासारख्या महत्वाच्या गुन्ह्यांसाठी पोलीस दलात स्थानिक गुन्हे शाखा कार्यरत आहे़ या शाखेत घुसखोरी करण्यासाठीही वशिला लावावा लागतो़ यावरुन या शाखेचे महत्त्व अधोरेखित होते़ परंतु पोलीस अधीक्षक मिना यांनी पदभार स्वीकारताच स्थानिक गुन्हे शाखेत सफाई अभियान चालविले़ त्यानंतर सपोनि ओमकांत चिंचोलकर यांच्या नेतृत्वात विशेष पथक स्थापन केले़ गेल्या दहाच दिवसांत या पथकाने जिल्हाभरात कारवायांनी गुन्हेगारांच्या मनात दहशत निर्माण केली आहे़ पथकाने विमानतळ-१, कंधार-३, सिंदखेड-१, मांडवी-१, नांदेड ग्रामीण-३, भोकर-२४, अर्धापूर-३, लोहा-१०, माहूर-५, तामसा-३, हदगाव-१ अशा एकूण ६१ आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत़ ११ पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झालेल्या १४ गुन्ह्यांमध्ये १ कोटी १२ लाख ६१ हजार ९७२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़ एकीकडे विशेष पथकाची धडाकेबाज कारवाई सुरु असताना, स्थानिक गुन्हे शाखेत मात्र सगळे कसे शांत शांत आहे़ विशेष पथकाच्या दहशतीने जिल्ह्यातील अनेक मटका पंटर, बुकींनी आपले अवैध धंदे बंद केले आहेत़ अवैध दारुविक्री करणारेही धास्तावले आहेत़