विजेत्या शाळांना बक्षिसांची रक्कम मिळेना
By Admin | Updated: September 26, 2014 01:19 IST2014-09-26T00:52:07+5:302014-09-26T01:19:39+5:30
विष्णू वाकडे , रामनगर जिल्हा प्रशासनाने सुमारे दीड वर्षांपूर्वी राबविलेल्या पर्यावरण जाणिव जागृती उपक्रमात जिल्ह्यातील शाळांना सहभाग नोंदवून बिया संकलन केले होते.

विजेत्या शाळांना बक्षिसांची रक्कम मिळेना
विष्णू वाकडे , रामनगर
जिल्हा प्रशासनाने सुमारे दीड वर्षांपूर्वी राबविलेल्या पर्यावरण जाणिव जागृती उपक्रमात जिल्ह्यातील शाळांना सहभाग नोंदवून बिया संकलन केले होते. यातील जास्त बिया संकलन करणाऱ्या पहिल्या तीन शाळांना रोख बक्षीस देण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र या तीनही बक्षीस पात्र शाळांची प्रशस्तीपत्रावरच बोळवन केली. त्यांना अद्यापपर्यंत जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या बक्षिसांची रक्कम देण्यात आली नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाची घोषणाही राजकीय पुढाऱ्यांच्या घोषणेप्रमाणेच ठरते की काय ? असा प्रश्न विद्यार्थी व शिक्षकांना पडला आहे.
जिल्ह्यात सन २०१२- १३ मध्ये जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. यासाठी तत्कालिन जिल्हाधिकारी श्याम देशपांडे यांनी विशेष प्रयत्न केले होते. त्यास जिल्हाभरातील शाळांनी मोठा सहभाग नोंदवून विविध प्रकारच्या बियांचे संकलन केले. संलग्न केलेल्या या बियांचे मोजमाप करून एकत्रिकरण करण्यात आले. सर्वाधिक तीन कोटी ८७ लाख ४८ हजार ७०१ एवढ्या बियांचे संकलन रामनगर येथील शिवाजी हायस्कुलने केल्याने या शाळेचा प्रथम क्रमाक आला होता.
तर जयभवानी विद्यालय देळेगव्हाणचा द्वितीय व जयभवानी विद्यालय जयपूरचा तृतीय क्रमांक आला होता. या उपक्रमात या तिन्ही शांळानी उल्लेखनीय कार्यकेल्याने २६ जानेवारी २०१३ रोजी शांळाचा प्रशस्तीपत्र देवून गौरव करण्यात आला. मात्र बक्षीसाची रक्कम देण्यात आलेली नाही. या बाबत शिक्षणाधिकारी प्रा. रामदास शेवाळे यांच्याशी संपर्क साधला असता तीन्ही शाळांना बक्षिसांची रक्कम मिळावी असेच मत व्यक्त केले.
या उपक्रमात प्रथम बक्षीस प्राप्त शाळांना १० लाख, द्वितीय ५ लाख व तृतीय १ लाखाचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. उपक्रम राबवून दिडवर्षाचा कालावधी उलटूनही प्रशासनाने या शांळाना बक्षीसाची रक्कम अदा केली नाही.ही रक्कम तात्काळ अदा करण्याची मागण होत आहे. (वार्ताहर)