वादळी वाऱ्यामुळे खंडित झाला ४० गावांतील वीजपुरवठा
By Admin | Updated: June 8, 2014 00:55 IST2014-06-08T00:20:20+5:302014-06-08T00:55:07+5:30
औराद शहाजानी : परिसरात गुरुवारी व शुक्रवारी रात्री वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला.

वादळी वाऱ्यामुळे खंडित झाला ४० गावांतील वीजपुरवठा
औराद शहाजानी : निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी परिसरात गुरुवारी व शुक्रवारी रात्री वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या वादळात अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. विजेच्या तारा तुटल्या आहेत. १४० पोल पडल्याने ४० गावांतील वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे अनेक गावे अंधारात आहेत. शिवाय, पंडित वीरभद्रजी आर्य विद्यालयातील सात वर्ग खोल्यांवरील पत्रे उडून गेले आहेत.
औराद शहाजानी, हलगरा, तगरखेडा, माळेगाव, वांजरखेडा, सावरी, शेळगी, कोटमाळसह अन्य गावांत शुक्रवारी रात्री जोरदार वादळी वारा व पाऊस झाला. या वादळात जुन्या औराद गावातील जवळपास ११० लोकांच्या घरांवरील पत्रे उडून गेले आहेत. वीजपुरवठा करणाऱ्या तारा तुटल्या आहेत. तसेच पोलही उन्मळून पडले आहेत. लातूर-बीदर रोडवरील फर्टिलायझर्स, सिमेंट व हॉटेल आदी दुकानांवरील पत्रे उडाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. पावसात चार व्यापाऱ्यांचे सिमेंट व खत पावसाने भिजले आहे.
औराद शहाजानीत रात्रभर वीजपुरवठा खंडित होता. शुक्रवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास गावातील काही भागांत वीजपुरवठा सुरु करण्यात आला आहे.
हलगरा येथील ३३ के.व्ही. उपकेंद्रावर रात्री वीज कोसळली. यामुळे त्या उपकेंद्राअंतर्गत असलेल्या सर्व गावांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. मागील वर्षी ६ व ७ जून रोजी औराद परिसरात वादळी वाऱ्यासह मोठा पाऊस झाला होता. त्यावेळीही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. वर्षभरापूर्वी पोल उन्मळून पडले होते. ते पडलेले पोल अद्यापही त्याच अवस्थेत आहेत.
महावितरणने दुर्लक्ष केल्यामुळे शेतकऱ्यांना विजेच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. त्याचबरोबर वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. तेरणा नदीकाठावरील अनेक पोल उन्मळून पडलेले असताना महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी याकडे सपशेल दुर्लक्ष केले आहे. वर्षभरापासून येथील शेतकऱ्यांची ओरड आहे. गुरुवारी झालेल्या वादळी वारा व पावसात अनेकांचे नुकसान झाले आहे. घरावरील पत्रे उडाल्याने सर्वसामान्य नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. (वार्ताहर)
काम सुरू आहे...
विस्कळीत झालेला विद्युतपुरवठा सुरू करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी तारा तुटल्या आहेत. पोलही उन्मळून पडले आहेत. तुटलेल्या तारा जोडणीचे काम सुरू असल्याचे कनिष्ठ अभियंता एस.बी. डोंगरे यांनी सांगितले. मागील वर्षी वादळात पडलेले पोल उभे करण्याचे काम सुरु असल्याचेही ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़