‘रोहयो’च्या मजुरीवरून वादळी चर्चा

By Admin | Updated: June 8, 2014 00:55 IST2014-06-08T00:38:47+5:302014-06-08T00:55:18+5:30

हिंगोली : जिल्ह्यात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत सुरू असलेल्या कामांची मजुरी वेळेत मिळत नसल्याने सेनगाव तालुक्याप्रमाणे मजुरांच्या असंतोषाचा उद्रेक होवू शकतो,

Windy talk from Roho's wages | ‘रोहयो’च्या मजुरीवरून वादळी चर्चा

‘रोहयो’च्या मजुरीवरून वादळी चर्चा

हिंगोली : जिल्ह्यात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत सुरू असलेल्या कामांची मजुरी वेळेत मिळत नसल्याने सेनगाव तालुक्याप्रमाणे मजुरांच्या असंतोषाचा उद्रेक होवू शकतो, असा गर्भित इशारा देत जि.प.च्या स्थायी समिती सभेत काही सदस्यांनी अधिकाऱ्यांना या विषयावर चांगलेच धारेवर धरले.
जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये ७ जून रोजी दुपारी अडीच वाजता जि.प. अध्यक्षा मीनाक्षी बोंढारे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा घेण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पोपटराव बनसोडे, उपमुख्य मुख्यकार्यकारी अधिकारी तृप्ती ढेरे, जि.प. उपाध्यक्ष उद्धवराव गायकवाड, कृषी सभापती राजाभाऊ मुसळे, समाजकल्याण सभापती मधुकर कुरूडे, समिती सदस्या अश्विनी यंबल, सदस्य अ‍ॅड. बाबा नाईक, ओमप्रकाश देशमुख, अनिल कदम, गजानन देशमुख, विनायक देशमुख यांची उपस्थिती होती. सभेच्या प्रारंभी केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर मागील सभेचे इतिवृत्त वाचन झाले. बैठकीत सर्वप्रथम वसमत तालुक्यातील हयातनगर येथील जि. प. शाळा बांधकामाचा मुद्दा सत्ताधारी सदस्यांनी लावून धरल्याने बैठकीमध्ये या विषयावर जोरदार चर्चा झाली. या शाळा इमारतीसाठी दोन हेक्टर जागा देण्यात आली; परंतु ग्रामपंचायतीच्या रेकॉर्डमध्ये नमुना नं.८ ला त्याची नोंद नसल्याने कामात अडचण येत असल्याचे सत्ताधारी पक्षाचे सभागृहातील गटनेते अनिल कदम यांनी अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिले. मागील सभेतही या विषयावर चर्चा झाली; परंतु त्याबाबत अद्याप निर्णय न झाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. जमीन मालकीत अडचण येत असल्याने सातबारावरील नोंद नमुना नं. ८ मध्ये भरून तसा प्रस्ताव ग्रामपंचायतकडून घेण्यास काय हरकत आहे? असा मुुद्दा उपस्थित करीत इतर सदस्यांनीही या चर्चेत भाग घेतला. अनिल कदम यांनी हयातनगर येथे कंत्राटदार पोलिस संरक्षण घेवून काम करीत असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरल्याचे सांगितले. त्यावर सीईओ बनसोडे यांनी सध्या ताब्यात असलेल्या जागेवरच काम करण्यात येत असल्याचे सांगून जमिनीच्या मालकीबाबतची अडचण लवकर सोडवून आवश्यक ती कार्यवाही १५ दिवसांत करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
कृषी सभापती मुसळे यांनी मग्रारोहयोंतर्गत जिल्ह्यात किती कामे सुरू आहेत? असे विचारले असता अधिकाऱ्यांनी ४१८ गावांमध्ये निरनिराळ्या प्रकारची कामे सुरू असल्याचे सांगितले. त्यातील पांदण रस्त्याच्या ५१ कामांबाबतचा मुद्दा उपस्थित झाला. मुसळे यांनी मग्रारोहयोच्या कामाची मजुरी वेळेत मिळत नसल्याचे सांगून सावळी पार्डी, रुपूर तांडा, नांदखेडा आदी १० गावांमध्ये हा प्रश्न गंभीर बनल्याचे सांगितले. तसेच सेनगाव तालुक्यात दोन वर्षांपूर्वी असाच प्रसंग उद्भवल्याने मजुरांनी जसा संताप व्यक्त केला त्या पद्धतीने औंढ्यातील अधिकाऱ्यांना एखाद्या मारहाणीच्या घटनेस सामोरे जावे लागू शकते, असा गर्भित इशारा देवून हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली. त्यावर सीईओंनी याबाबतची माहिती आठ दिवसांच्या आत सादर करण्याबाबत प्रभारी बीडीओंना सांगितले. इतर सदस्यांनी मग्रारोहयोची जुनीच कामे सुरू झाली नसल्याचा आरोप केला. तसेच राजाभाऊ मुसळे, विनायक देशमुख, ओमप्रकाश देशमुख यांनी पांदण रस्त्याच्या कामांचा मुद्दा चांगलाच लावून धरला. पाणंद रस्त्याची कामे महत्वाची असतानाही अधिकारी त्याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याची तक्रार देण्यात आली. यावेळी अ‍ॅड. बाबा नाईक यांनी दुरचुना येथे १ कि.मी. अंतराचे काम सुरू होवून पुन्हा बंद पडल्याचे सांगितले. त्याबाबत विचारणा केली असता संबंधित अधिकाऱ्यास उत्तर देता आले नाही. या सभेस ५० टक्के विभाग प्रमुख गैरहजर राहिल्याने सभेमध्ये कोणताही निर्णय होत नाही, मग स्थायीची सभा घ्यायची तरी कशाला? असा सवाल अ‍ॅड. नाईक यांनी उपस्थित केला. औंढा तालुक्यातील कामांबाबत शुक्रवारी आयोजित केलेली बैठक आचारसंहितेचे कारण दाखवून ऐन वेळी रद्द करण्यात आली. त्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी सभेत माहिती देताच सीईओ बनसोडे यांनी अशा बैठकांसाठी आचारसंहितेचा कुठलाही अडसर नसल्याचे स्पष्ट केले. कुरूंदा येथील जि. प. शाळा इमारत मुख्याध्यापकांकडे हस्तांतरित करण्यात आल्याचे सभेत सांगण्यात आले. याशिवाय तांडावस्ती सुधार योजनेचा आराखडा तयार करण्याबाबतचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यावर संबंधित विभागाचे अधिकारी घाडगे यांनी जि. प. कडे आलेले बहुतांश प्रस्ताव अपूर्ण असल्याचे सांगितले. सभेमध्ये गजानन देशमुख यांनी दलितवस्ती कामाचा मुद्दा ऐन वेळी उपस्थित केला. जि.प.कडे शाखा अभियंता व सक्षम अधिकाऱ्यांची यंत्रणा उपलब्ध असताना समाजकल्याण अधिकाऱ्यांकडून गुणवत्ता तपासणी करणे कितपत योग्य ठरेल? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.(प्रतिनिधी)
विविध विषयांवर चर्चा
सभेच्या प्रारंभी केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली वाहण्यात आल्यानंतर झाले मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन .
मग्रारोहयोच्या कामाची मजुरी वेळेत मिळत नसल्याचे सांगत मुसळे यांनी सावळी पार्डी, रुपूर तांडा, नांदखेडा आदी १० गावांमध्ये हा प्रश्न गंभीर बनल्याचे सांगितले.
सेनगाव तालुक्यात दोन वर्षांपूर्वी असाच प्रसंग उद्भवल्याने मजुरांनी जसा संताप व्यक्त केला, त्या पद्धतीने औंढ्यातील अधिकाऱ्यांना एखाद्या मारहाणीच्या घटनेस सामोरे जावे लागू शकते, असा गर्भित इशारा देवून हा प्रश्न मार्गी लावण्याची केली मागणी.
इतर सदस्यांनी मग्रारोहयोची जुनीच कामे सुरू झाली नसल्याचा केला आरोप.
अ‍ॅड. बाबा नाईक यांनी दुरचुना येथे १ कि.मी. अंतराचे काम सुरू होवून पुन्हा बंद पडल्याचे सांगितले. त्याबाबत विचारणा केली असता अधिकाऱ्यास देता आले नाही उत्तर.
सीईओंनी याबाबतची माहिती ८ दिवसांच्या आत सादर करण्यास सांगितले प्रभारी बीडीओंना.

Web Title: Windy talk from Roho's wages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.