चिंचोली गावाला वादळी पावसाचा तडाखा

By Admin | Updated: June 1, 2014 00:26 IST2014-05-31T23:57:38+5:302014-06-01T00:26:45+5:30

उमरगा शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास तालुक्यातील चिंचोली (जहांगीर) येथे झालेल्या वादळी पावसाने सुमारे तासभर झोडपले.

Windy rain in Chincholi | चिंचोली गावाला वादळी पावसाचा तडाखा

चिंचोली गावाला वादळी पावसाचा तडाखा

उमरगा शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास तालुक्यातील चिंचोली (जहांगीर) येथे झालेल्या वादळी पावसाने सुमारे तासभर झोडपले. यात अनेक घरांवरील पत्रे उडून गेल्याने ग्रामस्थांची चांगलीच त्रेधातिरपिट उडाली. यानंतर रात्री उशिरापर्यंत उडून रानोमाळ विखुरलेली पत्रे गोळा करण्यासाठी गावकर्‍यांची धावपळ सुरू होती. दरम्यान, विद्युत खांब, डीपीही उन्मळून पडल्यामुळे गावचा वीजपुरवठाही खंडित झाला आहे. या वादळी वार्‍याने शिवारातील लिंब, बाभळ, आंबा, चिंच, बोर आदी शेकडो झाडे उन्मळून पडली आहेत. यात सतीश ममाळे, तानाजी काळे, विनायक काळे, श्रीधर बोंडगे, प्रल्हास घोसले, रमेश बोंडगे आदी शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. शिवाय सुग्रीव ब्याळे, उल्हास पाटील यांनी प्रक्रियेसाठी ठेवलेल्या हळद पिकात पाणी गेल्याने त्यांनाही मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. सुहास पाटील, भास्कर शिंदे, रमेश बेंडगे या शेतकर्‍यांच्या शेतातील ऊस पिकालाही या वादळी पावसाचा जबर फटका बसला. शेतकर्‍यांनी जनावरांसाठी शेतात कडब्याच्या गंजी लावून ठेवल्या होत्या. या वादळी वार्‍याने हा कडबाही रानोमाळ विस्कटून गेला. यामुळे पशुधनाच्या चार्‍याचा प्रश्न आता गंभीर बनला आहे. प्रल्हाद भोसले घोसले या शेतकर्‍याच्या जनावरांचा कोठा वादळी वार्‍याने उडून जावून आत ठेवलेले खते, बियाणे पाण्याचे भिजून नुकसान झाले. या वादळी पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरून संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले. पडझड झालेल्या ग्रामस्थांचे संसार शनिवारी दिवसभर उघड्यावर असल्याचे दिसून आले. तसेच भितीपोटी या ग्रामस्थांनी शुक्रवारची रात्रही जागून काढली. एकूणच झालेल्या पडझडीमुळे या गावातील ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विद्युत खांब उन्मळून पडल्याने या गावातील वीजपुरवठा खंडित झाला असून, यामुळे पिण्याचे पाणी, दळण-कांडपाचा प्रश्न निर्माण झाला आहे. एकूणच झालेल्या या पडझडीमुळे ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तहसीलदार उत्तमराव सबनीस यांनी या भागातील तलाठी डी. टी. पवार व मंडळ अधिकारी विजयकुमार पाटील यांना आदेश दिल्याप्रमाणे तलाठी पवार यांनी शनिवारी गावातील नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू केले आहे. भरपाईची मागणी झालेल्या नुकसानीची भरपाई तातडीने करण्यात यावी, अशी मागणी सरपंच विजयाताई पाटील, सुहास पाटील, पं. स. सदस्य भास्कर शिंदे, उपसरपंच शाम घोसले, व्यंकट ममाळे, रमेश बोंडगे, राजेंद्र ममाळे, ज्ञानेश्वर काळे, उत्तमबाई जाधव, अनिता शिंदे, पद्मीनबाई गुरव, पार्वतीबाई कांबळे, सुवर्णा ब्याळे, शालीवाहन पाटील आदींनी केली आहे. (वार्ताहर) ग्रामपंचायत वार्‍यावर चिंचोली (ज) येथील ग्रामपंचायत इमारतीचे नव्यानेच बांधकाम करण्यात आले होते. शुक्रवारी सायंकाळच्या वादळी वार्‍यात या कार्यालयावरील पत्रे उडून गेल्याने कार्यालयातील महत्त्वाची कागदपत्रे, फर्निचर भिजून मोठे नुकसान झाले. शनिवारी दिवसभर वार्‍याने झालेल्या नुकसानीची पाहणी सरपंच विजयाताई पाटील, उपसरपंच श्याम घोसले यांच्यासह सदस्यांकडून सुरू होती. ग्रामपंचायत शेजारी वास्तव्यास असलेल्या सतीश ममाळे यांच्या घरावर झाड उन्मळून पडल्याने या कुटुंबालाही मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. अंगणवाडीची पडझड चिंचोली येथील १७४ क्रमांकाच्या अंगणवाडीवरील संपूर्ण पत्रे उडून गेल्याने अंगणवाडीतील तांदूळ, गहू, डाळी, वॉटर फिल्टर, गॅस शेगडी आदी साहित्याचे नुकसान झाल्याचे दिसून आले. निर्मला सूर्यवंशी या कार्यकर्तीने संबंधितांकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे. डीपी उन्मळून पडली गावच्या पाणीपुरवठा योजनेसाठी नव्याने उभारण्यात आलेला श्रीधर बेंडगे यांच्या शेतीजवळील विद्युत डीपी या वादळामुळे उन्मळून पडली. शिवाय या डीपीला जोडण्यात आलेले व इतर पन्नास ते साठ खांबही कोसळले असल्याने विजेच्या तारा जमिनीवर लोंबकाळत आहेत. शिवाय गेल्या चोवीस तासांपासून गावातील वीज पुरवठाही खंडित झाला आहे. यांना लागला मुका मार वादळी वार्‍यात घरांच्या झालेल्या पडझडीत गावातील विनायक काळे, प्रकाश काळे, संगीता काळे, शोभा काळे, तर गोठ्यावरील पत्रे उडाल्याने श्रीधर बोंडगे यांच्या शेतात काम करणारे शेतगडी अशोक अहिरे हे लोक जखमी झाले. अनेक पशुधनांनाही मुका मार लागल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले.

Web Title: Windy rain in Chincholi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.