वादळी पावसाने पुन्हा झोडपले
By Admin | Updated: May 31, 2014 00:56 IST2014-05-31T00:50:29+5:302014-05-31T00:56:38+5:30
किल्लारी : औसा तालुक्यातील किल्लारी व परिसराला गुरुवारी रात्री वादळी वार्यासह झालेल्या पावसाने झोडपून काढले.
वादळी पावसाने पुन्हा झोडपले
किल्लारी : औसा तालुक्यातील किल्लारी व परिसराला गुरुवारी रात्री वादळी वार्यासह झालेल्या पावसाने झोडपून काढले. त्यात परिसरातील ठिकठिकाणी वृक्ष व महावितरणचे विद्युत खांब उन्मळून पडले आहेत. तर या भागातील केळी व द्राक्ष बागांनाही मोठा फटका बसला आहे. औसा तालुक्यातील बहुतांश भागात गुरुवारी रात्री पुन्हा वादळी वार्यासह झालेल्या पावसाने हजेरी लावली. वार्याचा वेग प्रचंड असल्याने किल्लारी भागातील वृक्ष व खांब उन्मळून पडले. विद्युत ताराही तुटल्याच्या घटना घडल्या आहेत. गावातील घरांवरील तसेच शेतातील शेडचे पत्रेही उडाले. या पावसामुळे शेतकर्यांसह महावितरणचेही मोठे नुकसान झाले आहे. येथील सहाय्यक अभियंता खान व कनिष्ठ अभियंता पोतदार यांनी किल्लारी गावात चार खांब उन्मळून पडल्याची माहिती सांगितली. परिसरातही खांब कोसळले आहेत. त्याची माहिती एकत्र करणे सुरू असल्याचेही ते म्हणाले. खांब कोसळल्यामुळे बर्याच भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. त्याची दुरुस्ती करण्यात येत आहे. दरम्यान, किल्लारी येथील महादेव शिवहार पाटील यांच्या अडीच एकर केळीच्या बागेला वादळी वारा व पावसाचा फटका बसला. त्यात ५ लाखांचे नुकसान झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. गुंडाप्पा चंद्रकांत बालकुंदे या शेतकर्याच्या केळी बागेतील अडीचशे रोप मोडून पडल्याचे त्यांनी सांगितले. बळीराम बालकुंदे यांच्या अडीच एकर द्राक्ष बागेलाही फटका बसून मोठे नुकसान झाले आहे. (वार्ताहर)औसा : औसा तालुक्यातील काही भागात गुरुवारी रात्री तर काही भागांत शुक्रवारी सकाळीही पाऊस झाला आहे. ३० मे रोजी लग्नाचा मुहूर्त असल्याने या भागात मोठ्या संख्येने विवाह सोहळे सुरू होते. परंतु, अचानक लावलेल्या पावसाच्या हजेरीने समारंभात वºहाडींची तारांबळ उडाली. शुक्रवारी सकाळी औसा शहरासह किल्लारी, दापेगाव, जवळगा (पो.) व इतरही भागांत पावसाने हजेरी लावली. सकाळपासूनच या ठिकाणी ढगाळ वातावरण होते. भादा परिसरातही शुक्रवारी सकाळी पाऊस झाला.