आगामी लोकसभा निवडणुकीत ‘व्हीव्हीपॅट’चा १०० टक्के वापर होणार : मुख्य निवडणूक आयुक्त रावत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 16:27 IST2018-08-24T16:25:45+5:302018-08-24T16:27:12+5:30
आगामी २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत व्हेरिफिएबल पेपर आॅडिट ट्रायल मशीन अर्थात ‘व्हीव्हीपॅट’ या व्होटिंग मशीनचा शंभर टक्के वापर केला जाणार

आगामी लोकसभा निवडणुकीत ‘व्हीव्हीपॅट’चा १०० टक्के वापर होणार : मुख्य निवडणूक आयुक्त रावत
औरंगाबाद : मतदान करताना आपण दिलेले मत हे संबंधित उमेदवारासच मिळाले का याची खातरजमा व्हावी, यासाठी निवडणुकीत बॅलेट पेपरचा वापर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने २०१३ मध्ये दिले होते. या आदेशानुसार आगामी २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत व्हेरिफिएबल पेपर आॅडिट ट्रायल मशीन अर्थात ‘व्हीव्हीपॅट’ या व्होटिंग मशीनचा शंभर टक्के वापर केला जाणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त ओमप्रकाश रावत यांनी गुरुवारी येथे दिली.
जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पाहण्यासाठी ते शहरात आले होते. यावेळी जिल्ह्यासह मराठवाड्यातील निवडणूक तयारीचा आढावा विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर आणि जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडून घेतला. त्यानंतर निवडक संपादकांशी चर्चा करताना निवडणूक विभागातील उपलब्ध मनुष्यबळ, ईव्हीएम आदी मुद्यांवर चर्चा केली.
रावत म्हणाले की, निवडणूक विभागाच्या आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मागणीनुसार १७ लाखांपैकी दहा लाख मशीन उपलब्ध झालेल्या असून, उर्वरित सात लाख मशीन नोव्हेंबर महिन्यात मिळणार आहेत. त्यामुळे या निवडणुका व्हीव्हीपॅट मशीनद्वारेच होणार आहेत. या विभागातील मनुष्यबळाबाबत बोलताना ते म्हणाले की, देशभरात आमच्या विभागात केवळ ४०० कर्मचारी काम करतात. निवडणूक प्रक्रिया सुरू झाली की, एक कोटी दहा लाख कर्मचारी निवडणूक कामासाठी नियुक्त केले जातात. या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे, निरीक्षण आणि निवडणूक प्रक्रियेला सामोरे जावे लागते.
१४ महिन्यांपूर्वी फेब्रुवारीपासून लोकसभा निवडणूक प्रक्रियेची तयारी सुरूकरण्यात आली आहे. याचवेळी मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, मिझोराम या राज्यांच्याही निवडणुका होत आहेत. यात लोकसभा निवडणुकीची तयारी हे आमच्यासाठी प्राधान्यक्रम आहे. देशभरातील ६०० जिल्ह्यांत भेटी देणे आमच्यासाठी शक्य नाही; पण स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करूशकतो, असे ते म्हणाले. गोंदिया, करियाना येथील पोटनिवडणुकीत निर्माण झालेल्या ‘ईव्हीएम’च्या वादाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, दोन दशकांपासून या मशीनचा वापर होत आहे. मशीन म्हटले की त्यात काही दोषदेखील निर्माण होऊ शकतात. ईव्हीएममध्ये ०.५ ते ०.६ टक्के दोष येऊ शकतात, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. गुन्हेगारीमुक्त राजकारणासाठी शिक्षा झालेल्या उमेदवाराला उमेदवारी दिली जाऊ नये, या दिशेने प्रयत्न केले जात असल्याचे रावत म्हणाले.
अजिंठा लेणी कलाकृतीने प्रभावित
जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पाहून आपण प्रभावित झालो असून, कलाकारांनी निर्माण केलेली ही कलाकृती अजोड असल्याचे रावत म्हणाले.