जायकवाडीतून पाणी मिळेलच- बागडे
By Admin | Updated: November 25, 2014 00:56 IST2014-11-25T00:28:50+5:302014-11-25T00:56:40+5:30
वडीगोद्री : मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर वरच्या भागातील धरणातून जायकवाडीत पाणी सोडण्यासंदर्भातील निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी होईल,

जायकवाडीतून पाणी मिळेलच- बागडे
वडीगोद्री : मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर वरच्या भागातील धरणातून जायकवाडीत पाणी सोडण्यासंदर्भातील निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी होईल, असा विश्वास विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केला.
साष्टपिंपळगाव (ता. अंबड) या गावी सोमवारी रात्री आयोजित केलेल्या नागरी सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी आ. अॅड. लक्ष्मण पवार, माजी आ. गोविंद केंद्रे, आयोजक तथा ज्येष्ठ नेते शहाजी औटे उपस्थित होते. मराठवाड्यात याहीवर्षी अल्पशा पावसाने दुष्काळी स्थिती उद्भवली आहे. ५० टक्क्यांपेक्षा कमी आणेवारी आली असून खरीप व रबीचे अतोनात नुकसान झाले आहे. चारा व टंचाईचे संकटही उदभवले असून या स्थितीत सरकारी पातळीवरून शेतकऱ्यांना सर्वतोपरी दिलासा मिळेल, असा विश्वास बागडे यांनी व्यक्त केला. शेतीची अवस्था दिवसेंदिवस खालावत असल्याबद्दल बागडे यांनी खंत व्यक्त केली. यावेळी अनिरुद्ध झिंजुर्डे, अंगद काळे, मुरली चौधरी, दीपक ठाकूर, संजय हर्षे, कृष्णा जिगे, तुकाराम वायाळ, मोती पवार, सुरेश काळे होते. (वार्ताहर)
पाण्यास अनन्यसाधारण महत्त्व असून पाण्याचा अधिकाधिक सदुपयोग व्हावा म्हणून सर्वार्थाने प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा बागडे यांनी व्यक्त केली. ठिबकसाठी सबसिडी मोठ्या प्रमाणावर मिळावी, म्हणून प्रयत्न होतील. विजेस पर्याय म्हणून सौरउर्जेला अधिकाधिक अनुदान मिळविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असा विश्वास बागडे यांनी व्यक्त केला.