काँग्रेसपुढे युतीचे आव्हान टिकणार का?

By Admin | Updated: June 17, 2014 00:52 IST2014-06-17T00:46:01+5:302014-06-17T00:52:19+5:30

अनुराग पोवळे, नांदेड एकेकाळी शिवसेनेचा गड मानल्या जाणाऱ्या नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसने घट्ट पकड निर्माण केली आहे़

Will Congress challenge a coalition? | काँग्रेसपुढे युतीचे आव्हान टिकणार का?

काँग्रेसपुढे युतीचे आव्हान टिकणार का?

अनुराग पोवळे, नांदेड
एकेकाळी शिवसेनेचा गड मानल्या जाणाऱ्या नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसने घट्ट पकड निर्माण केली आहे़ लाटेच्या चर्चेतही नांदेड लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला सर्वाधिक मताधिक्य देत उत्तर विधानसभा मतदारसंघाने आपली पकड कायम ठेवली़ सेनेच्या मुळ कार्यकर्त्यांनी पुन्हा सेनेची वाट धरून विस्कटलेली घडी सुधारण्याचा प्रयत्न चालवला आहे़
दरम्यान, एमआयएम आणि संविधान पार्टीचे उमेदवारही आता मैदानात राहणार असल्याने येणारी लढत रंगतदार होईल़ तर २००९ च्या निवडणूक काळात अशोकराव चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री होते़ त्याचा परिणाम जिल्ह्यासह उत्तर विधानसभा मतदारसंघावरही जाणवला़ राजकारणातील नवखे परंतु शिक्षण क्षेत्रातील चेहरा असणारे डी़पी़ सावंत विजयी झाले़ सावंत यांच्याकडेच पुढे जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही आले़ परिणामी उत्तर मतदार संघातील विकासकामांना निधी कमी पडला नाही़ त्यामुळे लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात काँग्रेसला तब्बल ४३ हजार १५४ इतके मताधिक्य मिळाले़
दुसरीकडे या मतदारसंघात शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरू केली आहे़ नांदेडमधील शिवसेना ही अंतर्गत गटबाजीने पोखरलेली आहे, हे उघड गुपीत आहे़ या मतदारसंघातही सेनेचे संघटन पूर्णत: कोलमडले आहे़ काही दिवसांपूर्वी सेनेच्या दोन जिल्हाप्रमुखांची घोषणा मातोश्रीवरून करण्यात आली़ या दोन नेत्यांच्या नावाचे स्वागत शिवसेनेतून कमी अन काँग्रेसमधून अधिक झाले़
मूळचे शिवसेनेचेच असलेले प्रथम महापौर सुधाकर पांढरे यांनी मध्यंतरी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता़ काँग्रेसकडून दोन वेळेस ते नगरसेवक म्हणून निवडून आले़ पांढरे यांनीही नांदेड उत्तर मतदारसंघातून उमेदवारीची तयारी केली आहे़ पांढरे यांची संघटनशक्ती शहरी भागात मजबूत असली तरी ग्रामीण भागात त्यांना पोहोचावे लागणार आहे़
हिंगोली लोकसभा मतदारसंघात पराभूत झालेले शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांनीही उत्तरमधून विधानसभा लढविण्यासाठी पक्षाकडे तिकिटाची मागणी केल्याची चर्चा आहे़ २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतही वानखेडे यांनी नांदेड उत्तरमधून तयारी केली होती़
त्यामुळे आता शिवसेनेत तिकिटासाठी मोठी स्पर्धा असेल़ खुद्द जिल्हाप्रमुख प्रकाश कौडगे यांचीही निवडणूक लढविण्याची तयारी सुरू आहे़ तर मनसेचे इंजिन घेवून धावण्यास जिल्हाप्रमुख प्रकाश मारावार हेही सज्ज झाले आहेत़
एमआयएम आणि संविधान पार्टी हे दोन पक्ष नांदेडमध्ये एकत्र आहेत़ नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात येत असलेल्या भागात या पक्षाचे तीन नगरसेवक आहेत़ नांदेड दक्षिण आणि नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातून या पक्षांचे उमेदवार रिंगणात राहणार आहेत़ त्यात नांदेड उत्तरमधून संविधान पार्टीचे संस्थापक अध्यक्ष सुरेश गायकवाड यांनी तयारी सुरू केली आहे़ गायकवाड यांचे दलित चळवळीतील स्थान आणि मिळत असलेली एमआयएमची साथ हा महत्त्वाचा मुद्दा असेल़ त्यामुळे काँग्रेससह, शिवसेना व एमआयएम-संविधान, मनसे अशी चौरंगी लढत रंगण्याची चिन्ह आहेत़
काँग्रेसडी़पी़ सावंत  ६७०५२
शिवसेनाअनुसया खेडकर  २२९७०
अपक्ष डॉ़शीला कदम  १३४०८
इच्छुकांचे नाव पक्ष
डी़पी़ सावंत काँग्रेस
सुधाकर पांढरे  शिवसेना
सुभाष वानखेडे  शिवसेना
सुरेश गायकवाड  संविधान-एमआयएम
लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण (कॉंग्रेस) यांना ४३१५४ एवढे मताधिक्य

Web Title: Will Congress challenge a coalition?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.