पथदिव्यांसाठी नव्याने निविदा मागविणार
By Admin | Updated: November 19, 2014 01:00 IST2014-11-19T00:35:06+5:302014-11-19T01:00:18+5:30
औरंगाबाद : महापालिकेने दिलेल्या ११२ कोटींच्या एलईडी पथदिव्यांच्या कंत्राटाला उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ब्रेक लावला आहे,

पथदिव्यांसाठी नव्याने निविदा मागविणार
औरंगाबाद : महापालिकेने दिलेल्या ११२ कोटींच्या एलईडी पथदिव्यांच्या कंत्राटाला उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ब्रेक लावला आहे, त्यामुळे पालिकेने पथदिव्यांसाठी नव्याने कंत्राट देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
आॅगस्टमध्ये स्थायी समितीच्या बैठकीत ११२ कोटी रुपयांचे पथदिवे बसविण्याचे कंत्राट इलेक्ट्रॉन लायटिंग सिस्टिम्स प्रा.लि. आणि पॅरागॉन केबल इंडिया (जॉइंट व्हेंचर) या संस्थेला देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. ४० हजार एलईडी पथदिवे लावण्यासाठी ८६ कोटी ९३ लाख १७ हजार ४०० रुपये, इन्फ्रास्ट्रक्चर विकसित करण्यासाठी २५ कोटी २८ लाख ५० हजार ६८० रुपये, दोन्ही मिळून ११२ कोटी २१ लाख ६८ हजार रुपयांची ती निविदा होती. बीओटीवरील कामासाठी ९६ महिन्यांचा कालावधी होता. ३ महिन्यांचा प्रीपेटरी कालावधी होता. २ कोटी ७२ लाख रुपये दरमहा कं त्राटदाराला देण्याचा निविदेत उल्लेख होता. या निविदा प्रक्रि येवर कोर्टाने ताशेरे ओढल्यामुळे शहरातील पथदिव्यांचे काम सुरू झाले नाही. परिणामी पालिकेला आहे त्या कंत्राटदारांकडून पथदिवे लावण्याचे काम हाती घ्यावे लागले. मनपाने सध्या उभारून ठेवलेल्या खांबांचे व इतर साहित्य, पथदिवे काढून काय करणार, असा नगरसेवकांचा प्रश्न होता. त्या साहित्याचा लिलाव होईल, असे प्रशासनाचे मत होते. सध्या काम पाहणाऱ्या विनवॉक या संस्थेनेही मनपाला वीज बचतीच्या नावाखाली फसविल्याचा आरोप होतो आहे.
इन्फ्रास्ट्रक्च र बदलणे गरजेचे आहे. गंजलेल्या खांबांवर दिवे लावून उपयोग नाही. ११२ कोटींच्या निविदेचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे; परंतु शहराला अंधारात ठेवणे योग्य नाही. त्यामुळे पालिका नव्याने निविदा मागविण्याच्या प्रयत्नात आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
४४० हजार पथदिवे आणि २८ हजारांच्या आसपास खांब मुख्य रस्त्यांवर आहेत. जालना रोडसारखा रस्ता अंधारात आहे. पैशांअभावी सर्व कामे ठप्प आहेत, असे सूत्रांनी सांगितले.