वन्य प्राण्यांचा धुमाकूळ; शेतकरी त्रस्त
By Admin | Updated: July 11, 2017 00:23 IST2017-07-11T00:20:27+5:302017-07-11T00:23:54+5:30
हिंगोली : सेनगाव तालुक्यातील हानकदरी शेत शिवारातील वन्यप्राण्यांकडून पिकांची नासाडी होत आहे.

वन्य प्राण्यांचा धुमाकूळ; शेतकरी त्रस्त
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : सेनगाव तालुक्यातील हानकदरी शेत शिवारातील वन्यप्राण्यांकडून पिकांची नासाडी होत आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी वन्यप्राण्यांच्या बंदोबस्ताच्या मागणीचे निवेदन विभागीय वनाधिकाऱ्यांना १० जुलै रोजी दिले.
हानकदरी गावास सर्व बाजूंनी वन विभागाची सीमा आहे. त्यामुळे शेतात वन्य प्राण्यांचा धुडगूस असतो. शेतकऱ्यांची पिके फस्त केली जात असल्याने येथील परिसरातील शेतकरी चिंतेत सापडला आहे. येथील जंगलक्षेत्रात नीलगाय, रान डुक्कर, हरीण, वानर इ. प्राण्यांकडून शेतातील पिके फस्त केली जात आहेत. यामध्ये नीलगायींचा मोठ्या प्रमाणात उपद्रव वाढला आहे. पावसाच्या हुलकावणीमुळे शेतकरी अगोदरच चिंतेत आहे. त्यात आता वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या पिकांच्या नुकसानीचा फटका सहन करावा लागत आहे. वन्यप्राण्यांचा वन विभागाने तात्काळ बंदोबस्त लावावा अशी मागणी शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनावर उत्तम सिरामे, लीलाबाई सिरामे, लिंबाराव सिरामे, राजकुमार सिरामे, साहेबराव सिरामे, गुलाब राठोड, गोवर्धन पवार, विलास सिरामे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. मागणी तात्काळ मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
शेतकऱ्यांनी उसनवारी करून बी-बियाणे खरेदी केली. त्यामुळे पेरण्या करणे शक्य झाले. आता परत पिकांची नासाडी होत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. निवेदन देण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांसोबत कार्यालयातील काही कर्मचारी उद्धटपणे बोलल्याचे शेतकऱ्यांतून सांगितले जात होते.