डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून पत्नीचा खून
By Admin | Updated: July 23, 2014 00:41 IST2014-07-23T00:22:24+5:302014-07-23T00:41:16+5:30
वैजापूर : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने तिच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून राहत्या घरात खून केल्याची खळबळजनक घटना सोमवारी रात्री तालुक्यातील सोनवाडी येथे घडली.

डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून पत्नीचा खून
वैजापूर : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने तिच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून राहत्या घरात खून केल्याची खळबळजनक घटना सोमवारी रात्री तालुक्यातील सोनवाडी येथे घडली. या क्रूर पतीस पोलिसांनी गजाआड केले आहे.
सुनीता भीमराज खुरसाणे (३२), रा. सोनवाडी असे मृत पत्नीचे नाव आहे. भीमराज जगन खुरसाणे हा गेल्या अनेक दिवसांपासून पत्नी सुनीता हिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यामुळे तो तिला दोन-तीन वर्षांपासून दारू पिवून नेहमी मारहाण करीत असे.
त्याच्यातील संशयवृत्ती एवढी बळावली की त्याने सोमवारी रात्री राहत्या घरात पत्नी सुनीता हिच्या कानाच्या डाव्या बाजूस व डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून तिला ठार केले. कुऱ्हाडीच्या घावामुळे सुनीता रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी पंडित नवसारे, पोलीस निरीक्षक बापूसाहेब महाजन, सहायक पोलीस निरीक्षक रामहरी जाधव, प्रकाश पाटील, हवालदार संजय खंडागळे, पोलीस कॉन्स्टेबल अनंत जोशी, संतोष राठोड, नीलकंठ देवरे, जयसिंह नागलोत व सचिन सोनार यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पोलिसांनी कुऱ्हाड हस्तगत केली.
या प्रकरणी नानासाहेब सुभाष काकडे (२२), रा. वडाळी, ता. गंगापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खुरसाणे याच्याविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक बापूसाहेब महाजन करीत आहेत. (वार्ताहर)