चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून

By Admin | Updated: May 16, 2014 00:38 IST2014-05-16T00:37:10+5:302014-05-16T00:38:56+5:30

औरंगाबाद : चारित्र्याच्या संशयाने बेभान झालेल्या पतीने पत्नीच्या डोक्यात गॅस सिलिंडरने प्रहार करून तिचा खून केल्याची घटना स्वराजनगरात उघडकीस आली

Wife's blood on character suspicion | चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून

औरंगाबाद : चारित्र्याच्या संशयाने बेभान झालेल्या पतीने बुधवारी रात्रीच्या सुमारास झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात गॅस सिलिंडरने प्रहार करून तिचा खून केल्याची खळबळजनक घटना मुकुंदवाडी परिसरातील स्वराजनगरात आज सकाळी उघडकीस आली. पत्नीचा खून केल्यानंतर पती फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मुकुंदवाडी परिसरात स्वराजनगर येथील रहिवासी मीना राजेंद्र शेळके (२७) असे मयत विवाहितेचे नाव आहे. ९ वर्षांपूर्वी चिकलठाणा येथील प्रभाकर जौक यांची मुलगी मीना हिचे लग्न राजेंद्र कारभारी शेळके (रा. घायगाव धामोरी, ता. गंगापूर) याच्यासोबत झाले होते. प्रभाकर जौक हे केम्ब्रिज शाळेच्या बसवर चालक म्हणून काम करतात. राजेंद्र शेळके हादेखील ट्रकचालक आहे. जौक यांनी मुकुंदवाडी परिसरातील स्वराजनगर येथे रेल्वे पटरीजवळ एक प्लॉट घेऊन आपल्या मुलीला चांगले घर बांधून दिले होते. मीना शेळके हिला वैशाली (७) व साक्षी (५) या दोन मुली तसेच ऋषिकेश हा (दीड वर्ष) मुलगा आहे. काही दिवसांपूर्वी दोन्ही मुली चिकलठाणा येथे आपल्या आजोळी गेल्या असून, दोन वर्षांचा मुलगा मात्र स्वराजनगर येथे मीना शेळके हिच्यासोबतच होता. लग्न झाल्यानंतर काही वर्षांपासून राजेंद्र शेळके हा सतत पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. यातून त्यांच्यात अनेकदा भांडण व्हायचे. बुधवारी रात्रीदेखील पती-पत्नीमध्ये याच कारणावरून भांडण झाले. राजेंद्रने मीना हीस बेदम मारहाण केली होती. रात्री मीना झोपल्यानंतर राजेंद्रने तिच्या डोक्यात घरातील गॅसचा सिलिंडर घातला. गॅस सिलिंडरच्या प्रहारामुळे मीनाच्या डोक्याचा पार चेंदामेंदा झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मीनाला पाहून घाबरलेला राजेंद्र शेळके हा तेथून रात्रीच फरार झाला. गुरुवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास शेजारची मुलगी मीनाच्या घरी गेली तेव्हा ती रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेली दिसली. हे दृश्य पाहून ती शेजारची मुलगी घाबरून गेली. तिने आरडाओरड करीत तेथून पळ काढला. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी मीनाच्या घराकडे धाव घेतली. काही नागरिकांनी ही घटना मुकुंदवाडी पोलिसांना कळविली. पोलीस उपनिरीक्षक बागूल व घुले यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. मयत आईसोबत रात्रभर राहिला मुलगा काल रात्री ११ वाजेच्या सुमारास राजेंद्र हा नेहमीप्रमाणे दारूच्या नशेत घरी गेला. पती-पत्नीमध्ये वाद सुरू झाला. त्याने पत्नीला बेदम मारहाण केली. त्यामुळे ती उपाशीच झोपी गेली. मध्यरात्रीच्या सुमारास ती गाढ झोपेत असताना राजेंद्रने गॅसचे सिलिंडर तिच्या डोक्यात घातले. डोक्याचा चेंदामेंदा झाला. घरातील फरशीवर रक्ताचे थारोळे साचले होते, तर भिंतीवर सर्वत्र रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या होत्या. मोठा आवाज झाल्यामुळे झोपलेला ऋषिकेश जागा झाला. त्या परिस्थितीत राजेंद्रने मुलाला तेथे सोडून दरवाजा बाहेरून बंद केला व कडी लावून तो पसार झाला. निरागस ऋषिकेश यास आपली आई मरण पावली, याची किंचितही कल्पना आली नाही. तो रात्रभर आईच्या कुशीत झोपून राहिला. सकाळी शेजारच्या मुलीला घरातून बराच वेळेपासून मुलाच्या रडण्याचा आवाज आला. त्यामुळे तिने बाहेरून कडी उघडली व आत गेली. तेव्हा ते दृश्य पाहून ती घाबरून गेली. या घटनेमुळे स्वराजनगर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. कालची ती शेवटचीच भेट काल मीना ही चिकलठाणा येथे आपल्या मुलींना भेटण्यासाठी गेली होती. तेथून ती आपल्या दीड वर्षीय मुलासोबत घरी आली. मीना शेळके हिची वैशाली, साक्षी या दोन मुलींसोबतची ती अखेरचीच भेट ठरली. काही दिवसांपूर्वी मीना हीस पती राजेंद्रने दारूच्या नशेत प्रेशर कुकरने मारहाण केली. यात तिचा हात मोडला होता त्यामुळे पिता जौक यांनी तिला माहेरी नेले होते. मुकुंदवाडी ठाण्यात यासंदर्भात तक्रारही दाखल केली होती. पण, मुलीचा संसार मोडू नये म्हणून पोलिसांनी राजेंद्र शेळके याच्याकडून यापुढे मीनाला त्रास देणार नाही, असे बाँडपेपरवर लिहून घेतले होते. एक महिन्यापूर्वीच प्रभाकर जौक यांनी मीना हीस राजेंद्रकडे नेऊन सोडले होते. पतीच्या वर्तनात कसलीही सुधारणा झाली नव्हती. तो दारू पिऊन घरी आला की मीनाला मारहाण करीत असे.

Web Title: Wife's blood on character suspicion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.