रंगेल पतीला परस्त्रीसोबत हॉटेलमध्ये पकडून पत्नीने बदडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 00:45 IST2018-01-23T00:44:41+5:302018-01-23T00:45:01+5:30
परस्त्रीसोबत हॉटेलमध्ये गप्पा मारण्यात दंग झालेल्या नव-याला पत्नीने दामिनी पथकाच्या मदतीने चांगलाच हिसका दाखविला. ही घटना सिडको बसस्थानक परिसरातील एका हॉटेलमध्ये सोमवारी दुपारी घडली.

रंगेल पतीला परस्त्रीसोबत हॉटेलमध्ये पकडून पत्नीने बदडले
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : सावित्रीने यमाकडून आपल्या पतीचे प्राण वाचविल्याची आख्यायिका सर्वांना माहीत आहे; परंतु परस्त्रीच्या मोहात अडकलेल्या पतीची सोडवणूक करण्यासाठी एका या नारीने केलेल्या प्रयोगामुळे सोमवारी अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला.
त्याचे झाले असे की, परस्त्रीसोबत हॉटेलमध्ये गप्पा मारण्यात दंग झालेल्या नव-याला पत्नीने दामिनी पथकाच्या मदतीने चांगलाच हिसका दाखविला. ही घटना सिडको बसस्थानक परिसरातील एका हॉटेलमध्ये सोमवारी दुपारी घडली.
जयभवानीनगरातील रहिवासी ३५ वर्षीय सुशील (नाव बदलले) हा लेबर कॉन्ट्रॅक्टर आहे. पुंडलिकनगर रोडवर त्याचे कार्यालय आहे. विविध कंपन्यांना तो कामगार पुरवितो. काही दिवसांपूर्वी रत्ना (नाव बदलेले) ही तरुणी त्याच्याकडे नोकरी मागण्यासाठी आली होती. नोकरी देऊन त्याने तिला त्याच्या कार्यालयातच ठेवले. रत्नासोबत त्याची मैत्री वाढली. सुशील सोमवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास रत्नाला घेऊन बसस्थानक परिसरातील हॉटेलात गेला. दोघे तेथे गप्पा मारत असल्याची माहिती त्याच्या पत्नीला समजली. यामुळे पत्नी संतप्त झाली आणि पतीला धडा शिकविण्यासाठी तिने थेट पोलिसांच्या दामिनी पथकाला पाचारण केले. सुशील त्या महिलेसोबत हॉटेलमध्ये रंगल्याची तिने खात्री केली आणि दामिनी पथकाला सोबत घेऊन हॉटेल गाठले. तिने थेट हल्लाबोल करून पती सुशीलला चक्क सर्वांसमोर बदडून काढले. एवढेच नव्हे तर रत्नालाही तिने खडेबोल सुनावले. पोलिसांच्या वाहनातून सुशील आणि रत्नाला एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तेथे या घटनेची नोंद करण्यात आली.
महिलांशी लगट करण्याची सुशीलला सवय आहे. स्त्रियांना हॉटेलमध्ये नेऊन कार्यभाग उरकण्याच्या तो सतत प्रयत्नात असतो. त्याच्या गैरवर्तनाच्या तक्रारी पत्नीला अनेक दा आल्या होत्या. तिने त्याची समजूतही काढली होती. मात्र, सुशीलचा बाहेरख्यालीपणा कमी होत नव्हता. शेवटी संतापलेल्या पत्नीने पतीची आज चांगलीच खोड मोडल्याचे एमआयडीसी सिडको पोलिसांनी सांगितले. हा कौटुंबिक वादाचा प्रकार असून, सुशीलचे घर पुंडलिकनगर ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने तेथे तक्रार नोंदविण्याचे त्याच्या पत्नीला सांगण्यात आले. शिवाय रत्नानेही तक्रार नोंदविण्यास नकार दिला.