८० बसेसमध्ये वायफाय कार्यान्वित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 00:12 IST2017-09-02T00:12:15+5:302017-09-02T00:12:15+5:30
राज्य परिवहन महामंडळाने खाजगी वाहतुकीसोबत स्पर्धा करण्यासाठी एसटीमध्ये प्रवाशांना मोफत वायफाय देण्याचा निर्णय घेतला होता़ त्याअंतर्गत नांदेड विभागातील जवळपास ५२० बसेसमध्ये ही सुविधा देण्यात येणार होती़ त्यामध्ये नांदेड आगारातील ८० बसेसमध्ये ही सुविधा कार्यान्वित करण्यात आली असून टप्प्याटप्याने इतर बसेसमध्येही वायफाय मिळणार आहे़

८० बसेसमध्ये वायफाय कार्यान्वित
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: राज्य परिवहन महामंडळाने खाजगी वाहतुकीसोबत स्पर्धा करण्यासाठी एसटीमध्ये प्रवाशांना मोफत वायफाय देण्याचा निर्णय घेतला होता़ त्याअंतर्गत नांदेड विभागातील जवळपास ५२० बसेसमध्ये ही सुविधा देण्यात येणार होती़ त्यामध्ये नांदेड आगारातील ८० बसेसमध्ये ही सुविधा कार्यान्वित करण्यात आली असून टप्प्याटप्याने इतर बसेसमध्येही वायफाय मिळणार आहे़
प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद घेऊन धावणारे एसटी महामंडळ खाजगी वाहतुकीमुळे गेल्या काही वर्षांपासून तोट्यात जात आहे़ त्यासाठी महामंडळाकडून प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबविण्यात येतात़
ग्रामीण भागात एसटीशिवाय पर्याय राहिला नसला तरी, शहरी भागात मात्र प्रवाशांचा खाजगी वाहतुकीकडेच अधिक ओढा असतो़ ही बाब लक्षात घेऊन महामंडळाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आरामदायी बस तसेच दर्जेदार आणि मनोरंजनात्मक प्रवासासासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे़ तरुणांमध्ये वाढती मोबाईलची क्रेझ पाहता मनोरंजनासाठी सर्वच गाड्यांमध्ये वायफायचा निर्णय घेण्यात आला आहे़ त्याबाबतचे कंत्राट एका खाजगी कंपनीस देण्यात आले आहे़
पहिल्या टप्प्यात नांदेड आगारातील १३० पैकी ८० बसेसमध्ये ही सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे़ ती कार्यान्वितही झाली आहे़ सुरुवातीला डेटा कमी असून पुढे तो वाढविण्यात येणार आहे़ ग्रामीण भागात नेटवर्कमध्येही अडचणी येत आहेत़ या अडचणी सोडविण्यासाठीही प्रयत्न करण्यात येत आहेत़