जिल्ह्यात सर्वदूर पावसाची भुरभुर

By Admin | Updated: October 27, 2014 00:10 IST2014-10-27T00:07:11+5:302014-10-27T00:10:02+5:30

उस्मानाबाद : जिल्ह्यात रविवारी पहाटे व दिवसभर झालेल्या स्वाती नक्षत्राच्या भुरभुर पावसामुळे सोयाबीनसह मका पिकाचे नुकसान झाले असले तरी तुरीसह इतर पिकांना दिलासा मिळाला आहे़

The whole monsoon rains in the district | जिल्ह्यात सर्वदूर पावसाची भुरभुर

जिल्ह्यात सर्वदूर पावसाची भुरभुर


उस्मानाबाद : जिल्ह्यात रविवारी पहाटे व दिवसभर झालेल्या स्वाती नक्षत्राच्या भुरभुर पावसामुळे सोयाबीनसह मका पिकाचे नुकसान झाले असले तरी तुरीसह इतर पिकांना दिलासा मिळाला आहे़ तसेच रखडलेली रबीची पेरणीही या पावसामुळे सुरू होण्याची शक्यता आहे़ तर दिवसभराच्या रिपरिपीमुळे शेतातील कामे खोळंबली असून, वातावरणातील गारव्यामुळे अबालवृध्द हैराण झाले आहेत़
जिल्ह्यात यंदा पावसाने पाठ फिरविल्याने खरीप हंगामात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे़ परतीचा पाऊसही अपेक्षितरित्या न पडल्याने रबीची पेरणीही खोळंबली आहे़ त्यातच शुक्रवारपासून वातावरणातील बदलामुळे जिल्ह्यात पाऊस पडण्याची अपेक्षा बळावली होती़ शनिवारी पहाटे ते दुपारी चार वाजेपर्यंत जिल्ह्यात रिमझिम पाऊस झाला़ तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी परिसरात पहाटे सुरू झालेला पाऊस दिवसभर सुरुच होता़ सध्या सोयाबीन व मका काढणीचा जोर भागात चालू आहे. परंतु पावसाने शेतीची कामे होवू शकली नाहीत. तर काढलेल्या सोयाबीनचे पीक पावसाने भिजले असून, नुकसानीला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. शेतात ओलीअभावी खोळंबलेल्या ज्वारीच्या पेरणीस या स्वाती नक्षत्राच्या पावसाने सुरुवात होणार आहे. माळरानावरील सुकू लागलेल्या तुरीच्या पिकाला या पावसामुळे जीवदान मिळाले आहे. तर उगवण झालेल्या ज्वारी पिकाच्या वाढीस हा पाऊस फायदेशीर ठरणारा आहे. दिवसभर पावसाची रिपरिप सुरु असून, हवेत गारवाही कायम होता. रिपरिप पावसाने नागरिकांना घराबाहेर पडता आले नाही. तर अचानक हवामानात बदल होवून पाऊस आल्याने त्याचा परिणाम द्राक्षबागांवर होत असल्यामुळे बागायतदारात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवाय उस्मानाबादसह जिल्हाभरात दिवसभर पावसाने हजेरी लावली होती़ रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचल्याने चालकांना कसरत करीत वाहने चालवावी लागली़ एकूणच रविवारी दिवसभर झालेल्या पावसामुळे काही पिकांना दिलासा मिळाला असून, काही पिकांसाठी हा पाऊस धोकादायक ठरत आहे़ तसेच रखडलेली रबीची पेरणी सुरू होण्याची शक्यताही व्यक्त होत आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: The whole monsoon rains in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.