अख्खे कुटूंब उतरले प्रचारात
By Admin | Updated: October 5, 2014 00:48 IST2014-10-05T00:29:04+5:302014-10-05T00:48:14+5:30
जालना : जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघात उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सर्व आघाड्यांवर प्रचार मोहिमने वेग घेतला आहे. या प्रचार मोहिमेत आता

अख्खे कुटूंब उतरले प्रचारात
जालना : जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघात उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सर्व आघाड्यांवर प्रचार मोहिमने वेग घेतला आहे. या प्रचार मोहिमेत आता आता उमेदवारांच्या सौभाग्यवतींसह संपूर्ण कुटुंबच प्रचारात उतरले असल्याचे चित्र पाचही मतदार संघात पाहावयास मिळत आहे.
मतदानाची तारीख जवळ येत आहे तशा प्रचाराच्या कक्षा रुंदावत आहे. प्रत्यक्ष गाठीभेटी, पदयात्रा, सोशल मीडियाचा माध्यमातून प्रचार सुरु आहे. पाचही विधानसभा मतदार संघातील मात्तबर उमेदवार तसेच अपक्षांच्या सौभाग्यवती पदर कोचून सरसावल्या आहेत. ग्रामीण भागासोबतच शहरातील प्रत्येक गल्ली, नगर, वसाहतींमधून प्रचार सुरु झाला आहे. महिलांसोबत प्रत्यक्ष गाठीभेटी, संवाद साधून प्रचार केला जात आहे. सौभाग्यवती सकाळीच महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांसह प्रचार मोहिमेवर निघत आहेत. काहींनी तीन ते चार प्रचार फेऱ्या पूर्ण केल्या आहेत.
जालना विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे उमेदवार अर्जुन खोतकर यांच्या पत्नी सीमाताई खोतकर, भाऊ अनिरुद्ध व संजय खोतकर, काँग्रेसचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांच्या पत्नी संगीता गोरंट्याल तसेच अन्य पक्षांच्या उमेदवारांच्या पत्नी, भाऊ, मुले तसेच इतर नातेवाईकांनी प्रचारासाठी शहराचा मोठा भाग पिंजून काढला आहे. सकाळपासून सुरु झालेल्या प्रचार यात्रा रात्री संपत आहेत.
भोकरदन मतदार संघात भाजपाचे उमेदवार संतोष दानवे यांच्यासाठी त्यांचे वडील केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे है मैदानात उतरले आहेत. प्रचाराचे इत्यंभूत नियोजन ते लावत आहेत. त्याचबरोबर आई निर्मला दानवे याही मुलासाठी प्रचारात उतरल्या आहेत. चंद्रकांत दानवे यांचे भाऊ सुधाकर दानवे व वडील पुंडलिक हरी दानवे हे प्रचाराचे सूत्र सांभाळत आहेत.
घनसावंगी मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश टोपे यांच्या पत्नी मनीषा टोपे, भाऊ सतीश टोपे यांनी अनेक दिवसांपासून खेड्या पाड्यांचे दौरे करुन प्रचार सत्र चालविले आहे.
त्याचबरोबर भाजपाचे उमदेवार विलास खरात व त्यांचे पुतणे किरण खरात, शिवसेनेचे हिकमत उढाण यांच्या पत्नी माया उढाण तसेच त्यांचे भाऊ, भावजयी व इतर नातेवाईक, काँग्रेसचे संजय लाखे पाटील व त्यांच्या पत्नी इंदिरा लाखे पाटील तसेच त्यांचे नातेवाईकही प्रचारात आघाडीवर आहेत.
बदनापूरमध्ये शिवसेनेचे संतोष सांबरे व त्यांचे भाऊ आनंद सांबरे, राष्ट्रवादीचे बबलू चौधरी व त्यांचे भाऊ सुनील चौधरी तसेच अन्य नातेवाईक, मनसेचे माऊली गायकवाड, भाजपाचे नारायण कुचे, काँग्रेसचे सुभाष मगर आदींचे भाऊ, मुले, चुलते आदींनी प्रचारासाठी कंबर कसली आहे.
परतूर मधून काँग्रेसचे सुरेश जेथलिया,त्यांच्या पत्नी विमल जेथलिया, पुत्र नितीन जेथलिया, राष्ट्रवादीचे प्रा. राजेश सरकटे व त्यांचे भाऊ संजय सरकटे, भाजपाचे बबनराव लोणीकर व त्यांचे पुत्र राहुल लोणीकर, मनसेचे बाबासाहेब आकात, त्यांच्या पत्नी आशा आकात, पुत्र कपिल व आकात यांचे भाऊ, मुले, चुलते, पुतणे प्रचारात व्यस्त आहेत.
नातेवाईकांचा मित्र परिवारही आपल्या उमेदवारासाठी फिल्डिंग लावत आहे. एकंदर प्रचारातील रंगत आता वाढत असून शहर व ग्रामीण भागात पदयात्रांचे प्रमाण वाढले आहे. (प्रतिनिधी)
जिल्ह्यातील पाचही मतदारसंघात उमेदवारांच्या प्रचाराने आता गती घेतली आहे. सकाळपासून रात्री प्रचार संपण्याच्या वेळेपर्यंत उमेदवारांसह त्यांच्या कुटुंबातील, नात्यागोत्यातील मंडळी प्रचारात व्यस्त आहेत. जेवणाची तमा न बाळगता दिवसभर कुटुंबातील व्यक्ती गावोगाव पिंजून काढत आहेत.
४सध्या आॅक्टोबर हिट असल्याने त्याचाही त्रास होत आहे. मात्र तो सहन करून पदयात्रा, कॉर्नर बैठका, छोट्या सभा घेऊन आपल्या उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन ही मंडळी करीत आहेत. मतदारांना विविध आश्वासने दिली जात असून आपल्या पक्षाचा, वैयक्तिक स्वरूपाचा जाहीरनामा मतदारांसमोर मांडण्याचे कामही या मंडळींकडून होत आहे. जवळपास सर्व उमेदवारांच्या कुटुंबातील मंडळींनी प्रचारासाठी कंबर कसली आहे.